'दिग्गजांच्या आत्मपर लेखनात केवळ गोडवेच'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 मे 2017

‘गगनिका’ हे नाटकाचे नसलेले पण नाटकाभोवती फिरणारे पुस्तक आहे. वाचकांसमोर नव्याने जाण्याचा हा प्रयत्न आहे.
- सतीश आळेकर, नाटककार

पुणे - ‘‘कलावंतांनी स्वत:बद्दलचा लेखाजोखा देताना अपयशाबद्दलची चर्चा भरपूर करावी. त्यामुळे त्या कलावंताचा आंतरिक आणि कलात्मक प्रवास कसा झाला, हे वाचकांना कळू शकेल; पण विजया मेहता, डॉ. श्रीराम लागू, सई परांजपे, गिरीश कार्नाड, सतीश आळेकर या रंगभूमीवरील ज्येष्ठ- श्रेष्ठ, आदरणीय लोकांनी स्वत:च्या आत्मपर लेखनात याबद्दल काहीच लिहिले नाही. केवळ यश नोंदवले आहे,’’ अशी खंत नाटककार महेश एलकुंचवार यांनी रविवारी व्यक्त केली. स्वत:च्या अब्रूची प्रेतयात्रा काढण्याची हिंमत असली तरच आत्मवृत्त लिहावीत, असेही ते म्हणाले.

‘आशय सांस्कृतिक’तर्फे आयोजित सोहळ्यात नाटककार सतीश आळेकर लिखित ‘गगनिका’ या पुस्तकाचे प्रकाशन एलकुंचवार यांच्या हस्ते झाले. या वेळी ‘राजहंस’चे सदानंद बोरसे, ‘आशय’चे वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार उपस्थित होते.

एलकुंचवार म्हणाले, ‘‘त्रयस्थ म्हणून त्यांचे लेखन वाचताना यांच्या जीवनात अपयश आलेच नाही, असे वाटते. कलासिद्धी करताना स्वत:च्या आत काय घडले, तुमची कुठे फसगत झाली, कुठल्या वाटा टाळल्या, कुठल्या स्वीकारल्या हे कोणालाही माहिती नाही. ते लेखनातून सांगायला हवे. ’’

‘‘आळेकर यांची ‘बेगम बर्वे’, ‘महानिर्वाण’ ही भारतीय रंगभूमीवर सर्वांत मोठी नाटके आहेत. पहिल्या दहा नाटकांत ही नाटके घ्यावीच लागतील; पण महाराष्ट्राच्या बाहेर ही नाटके लोकांना कळत नाहीत, अशी कुजबूज आपल्याकडे सुरू असते. ती चुकीची आहे,’’ असेही ते म्हणाले. 

Web Title: Playwright Mahesh Elkunchwar