निवृत्तीच्या दिवशी फौजदाराचा आगळा सन्मान ! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

प्रदीर्घ सेवा बजावल्यानंतर निवृत्तीच्याक्षणी निरोप घेताना मन भरून येतं! त्यात सहकाऱ्यांकडून जर वेगळ्या पद्धतीने निरोप मिळाला, तर इतक्‍या वर्षांच्या सेवेचे सार्थक होते. बारामतीतून निवृत्त झालेले सहायक फौजदार दिनकर चंदुलाल जाधव यांनाही निवृत्तीच्यादिवशी असाच सुखद धक्का बसला. 

बारामती शहर : प्रदीर्घ सेवा बजावल्यानंतर निवृत्तीच्याक्षणी निरोप घेताना मन भरून येतं! त्यात सहकाऱ्यांकडून जर वेगळ्या पद्धतीने निरोप मिळाला, तर इतक्‍या वर्षांच्या सेवेचे सार्थक होते. बारामतीतून निवृत्त झालेले सहायक फौजदार दिनकर चंदुलाल जाधव यांनाही निवृत्तीच्यादिवशी असाच सुखद धक्का बसला. 

31 जुलै रोजी दिनकर जाधव सेवानिवृत्त झाले. त्या दिवशी बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी त्यांना अभिनव पद्धतीने निरोप देण्याचे ठरविले. जाधव यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यांच्याविषयी सर्वच अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनीही मनोगतात कृतज्ञता व्यक्त केली. 

जाधव यांना निरोप देण्यासाठी पोलिस ठाण्याच्या गाडीला दोर बांधण्यात आले होते. त्यात दिनकर जाधव बसले होते. औदुंबर पाटील, सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी शेंडगे, सतीश अस्वर, योगेश शेलार, पद्मराज गंपले या अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांनी हे दोर ओढून त्यांची गाडी पोलिस ठाण्याबाहेर नेली.

पोलिस ठाण्यातून निघताना सर्व अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी त्यांना मानाचा कडक सॅल्यूट दिला, तेव्हा साहजिकच दिनकर जाधव व कुटुंबीयांना भरून आले होते. एका सहकाऱ्याला अशा अभिनव पद्धतीने दिलेल्या निरोपामुळे पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये कौतुकाची भावना होती.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A pleasant shock on the day of his retirement to police