कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करायचयं? करियर आणि बिझनेसमध्ये 'या' आहेत संधी

Plenty of opportunities in career and business in computer engineering.jpg
Plenty of opportunities in career and business in computer engineering.jpg

पुणे : कॉम्प्युटर इंजिनिअरिंग क्षेत्रात मागील दोन-तीन दशकांत आमूलाग्र क्रांती झालेली असून, आजच्या तंत्रआधारित आणि स्पर्धात्मक युगात हे सर्वाधिक आकर्षक क्षेत्र ठरले आहे. शासकीय, खासगी आणि सार्वजनिक आस्थापना वेगाने संगणकीकृत होत आहेत. मोबाईल आणि मोबाईल ॲपद्वारे उपलब्ध सुविधा, ऑनलाइन मार्केटिंग, ई-कॉमर्स, नेटबँकिंग, डिजिटल इंडिया, नेटवर्क आणि सेक्युरिटी, सायबर सिक्युरिटी, डेटाबेस मॅनेजमेंट, ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा आणि वाढते सेवाक्षेत्र यांच्या आवश्यकतेनुसार कॉम्प्युटर तंत्रज्ञान वापरून सॉफ्टवेअर विकसित करणे त्याचे व्यवस्थापन करणे अशा विविध संधी उपलब्ध आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशातील मोठी शहरे, छोटी शहरे आणि खेडीसुद्धा स्मार्ट सिटी आणि स्मार्ट व्हिलेज करण्यावर भर दिला जात असून, त्यामध्ये जास्तीत जास्त संगणकीकृत तंत्रज्ञान वापरले जात आहे.  या विविध संधींमुळे विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल या क्षेत्राकडे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर वळला आहे. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य यापुढील काळात उज्ज्वल असणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


कॉम्प्युटर इंजिनिअरिंग क्षेत्रात विविध उपक्षेत्रे म्हणजे कोडिंग, क्रिप्टोग्राफी, इन्फॉर्मेशन प्रोटेक्शन, कम्युनिकेशन आणि वायरलेस नेटवर्क, कंपाइलर्स आणि ऑपरेटिंग सिस्टीम्स, कॉम्प्युटर नेटवर्क, मोबाईल कॉम्प्युटिंग, कॉम्प्युटर व्हीजन आणि रोबोटिक्स,  एम्बेड्डेड सिस्टीम, क्वांटम  कॉम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डीप लर्निंग आणि इंटरनेट ऑफ थिंग्स ही होत. कॉम्प्युटरच्या क्षेत्रात डिझायनिंग हे क्षेत्र वेगाने विकसित होत आहे. आज प्रत्येक स्तरावर तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य बनत चालला आहे. अशा काळात नेटवर्किंग इंजिनीयर, सिस्टीम डिझाईनर, सिस्टीम ॲनालिस्ट, सिस्टीम प्रोग्रामर, डेटाबेस मॅनेजर, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर इंजिनियर्स साठी भारतात खूप संधी उपलब्ध आहेत. तसेच परदेशातही भारतीय कॉम्प्युटर इंजिनियरला मोठी मागणी आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील नोकरी व्यतिरिक्त तुम्ही स्वतः सॉफ्टवेअर विकसित करून स्वतःचा व्यवसाय पण करू शकता. तसेच स्टार्टअप्स कंपन्यांसाठी सरकार कडून अर्थसहाय्य उपलब्ध होऊ शकते. 

कॉम्प्युटर इंजिनियरिंग केलेल्या अभियंत्यांना सिंगापूर, अमेरिका, कॅनडा, जापान, ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंगडम, मलेशिया, पोलंड, साऊथ कोरिया या देशांत नेहमीच संधी उपलब्ध असतात. अॅपल, सिस्को, डेल, एचपी, आयबीएम, इंटेल, मायक्रोसॉफ्ट, एनव्हीडीआय, क्वालक्वाम, युनिसिस, झेरॉक्स कॉम्प्युटर्स या मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी मिळविणे ही कॉम्प्युटर  इंजिनियरचे स्वप्नं असते आणि ते मिळवतात सुद्धा. भारतातील आयटी क्षेत्रातील मोठमोठ्या कंपन्या म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस (टीसीएस), इन्फोसिस, विप्रो, एचसीएल टेक्नॉलॉजीज, टेक महिंद्रा, एल अँड टी इन्फोटेक, एमफसिस, माइंड ट्री इत्यादी कंपन्यांमधून संगणक अभियंत्यांना मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध असतात. 

तसेच भारतातील सरकारी क्षेत्र जसे की राष्ट्रीय बँका, सायबर सेल, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कस ऑफ इंडिया (एसटीपीआय) या व इतर अनेक सरकारी क्षेत्रात  कॉम्प्युटर इंजीनियरची मागणी वाढत आहे. कॉम्प्युटर इंजीनियरिंग क्षेत्राशी संबंधित बी. टेक. कॉम्प्युटर, बी. ई. कॉम्प्युटर/आय. टी. हे पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर एम. टेक., एम. ई., एम. एस. कॉम्प्युटर, एमसीए, एमबीए हे पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे पर्याय उपलब्ध असतात. पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर शैक्षणिक स्तरावर प्राध्यापक बनण्याचाही पर्याय उपलब्ध आहे. त्याच प्रमाणे पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर संशोधनाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना पीएचडी पूर्ण करून संशोधनाच्या संधी उपलब्ध आहेत. 

सुपरकॉम्प्युटर एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर (एसईआरसी), सेंटर फॉर एआय अँड रोबोटिक्स (सीएआयआर), सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॉम्प्युटेशन (सी-डॅक), इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो), सी-डॉट, सीएमसी, आयआयएससी, आयआयटी व विद्यापीठांमधून मोठ्या प्रमाणावर या क्षेत्रामध्ये संशोधन केले जाते. तसेच टेक्नॉलॉजी बिजनेस इनक्युबेटर (टीबीआय) या सरकारच्या उपक्रमाअंतर्गत तुम्ही स्वतःची स्टार्टअप कंपनी सुद्धा सुरू शकता. 

कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये प्रवेशाविषयी आता जाणून घेऊयात...
बारावी नंतर चार वर्षाच्या या कोर्समध्ये पीसीएम घेऊन जेईई व एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षांच्या माध्यमातून सरकारी तसेच खासगी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता येऊ शकतो.  कॉम्प्युटर इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये करिअर आणि उद्योगाच्या विविध संधी उपलब्ध आहेत या संधींचा वापर करून भविष्य नक्कीच उज्वल करता येऊ शकते. 

- डॉ. किशोर कोल्हे (एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com