PM मोदींसह विविध देशांचे राजदूत 27 व 28 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 24 November 2020

अदर पूनावाला यांनी जानेवारी अखेरपर्यंत लशीचे 10 कोटी डोस तयार  असतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यांच्या या घोषणेची चर्चा रंगत असताना आता लशीच्या प्रगतीसंदर्भातील माहिती घेण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी  पुणे दौऱ्यावर येण्याची चर्चा सुरु झाली आहे.  पुढील दोन ते तीन महिन्यात भारतामध्ये लस उपलब्ध होईल.  जानेवारीपर्यंत किमान 10 कोटी डोस तयार असतील.  अशी माहिती अदर पूनावाला यांनी यापूर्वी दिली होती. मोदींसह 98 देशांचे राजदूत 27 नोव्हेंबरला पुण्यातील सिरम इन्सिट्यूटला भेट देणार असल्याचेही समजते आहे.

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध देशांचे राजदुत येत्या शनिवारी पुणे दौऱ्यावर येत आहेत. कोरोनावरील लशीचा आढावा घेण्याकरीता या दौऱ्यात प्राधान्य दिले जाणार आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठ व सीरम  इन्स्टिट्यूट यांच्यातर्फे तयार करण्यात येत असलेली कोरोनावरील लस उत्पादनाच्या अंतिम टप्प्यात आहे. त्याची पाहणी करण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत.

दरम्यान, त्यांच्यासमवेत विविध देशांचे राजदूत असणार आहेत. पंतप्रधान मोदी व काही देशांचे राजदूत हे दिल्ली येथून तर रशिया व सौदी अरेबियाचे राजदूत मुंबईहून विमानाने पुण्यात  लोहगाव विमानतळावर दाखल होणार आहेत. त्यानंतर ते सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन कोरोना लशीचा आढावा घेणार आहेत.

 5 स्टार हॉटेलमधून पार्सल मागवून शहा आदिवासी कुटुंबियांसोबत जेवले, ममता बॅनर्जींचा दावा

याबाबत प्रशासनामध्ये हालचाली सुरु झालेल्या आहेत.राजदूतांच्या दौर्‍याबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी बैठक घेतली आहे. या संदर्भात त्यांनी प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. राजदूतांचा दौरा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.  शंभर राजदूत 27 नोव्हेंबरला सीरमला भेट देणार आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांचा दौरा अद्याप प्राप्त झालेला नसला तरीही ते 27 किंवा 28 नोव्हेंबरला पुण्यात येतील असे प्रशासकीय सुत्रानी सांगितले.

 हेही वाचा - भाजप करतंय २०२४ची तयारी; राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांनी तयार केलाय प्लॅन

केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना या भेटीची माहिती देत तिचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच या दौऱ्याबाबत परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी राव यांच्यासह पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याशी सविस्तर चर्चा करून कार्यक्रम निश्चित केला असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यानी माहिती दिली.
 

  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm narendra modi visit Pune serum institute corona vaccine Upcoming Day