...तर 'जम्बो' व्यवस्थापनावर कारवाईची छडी उगारली जाणार; अतिरिक्त आयुक्तांचा इशारा

IAS_Rubal_Agarwal
IAS_Rubal_Agarwal

पुणे : कोरोनाने बेजार झालेल्या आणि अत्यवस्थ रुग्णांना मोफत, नेमक्‍या उपचाराची आशा दाखवून, गाजावाजा करीत उभारलेल्या जम्बो कोविड केअर सेंटरचा 'हिशेब' घेण्यास आता सुरवात झाली आहे. सेंटरमधील प्रत्यक्ष बेड, डॉक्‍टर, नर्ससह अन्य सुविधांचा तपशिल महापालिकेने मागविला आहे. त्याचवेळी रुग्णांकरिता अत्यंत महत्त्वाच्या उपचार व्यवस्थेसह औषधांचा पुरवठा, रुग्णांसाठीचे जेवण आणि स्वच्छतेचा दर्जाही जाणून घेण्यात येणार आहे.

या बाबींकडे थोडेही काणाडोळा केल्यास 'जम्बो' व्यवस्थापनावर कारवाईची छडी उगारली जाणार आहे. एवढेच नाही; तर 'जम्बो'च्या दारात महापालिकेचे अधिकारी नेमून गरजू रुग्णांना सहजरित्या उपचार मिळण्याची व्यवस्थाच महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सोमवारी केली. तेव्हाच जम्बोसाठी नेमलेल्या एजन्सीसह 'पीएमआरडी', ससून रुग्णालय आणि महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांची बैठक घेतली आणि सेंटरमधील मनुष्यबळाची वस्तुस्थिती मांडण्याचा आदेशही अग्रवाल यांनी जबाबदार यंत्रणांना दिला आहे.

परिणामी, 'जम्बो'चा उद्देश साध्य होण्याची थोडीफार आशा आहे. गरीब आणि गरजू रुग्णांसाठी 'सीओईपी'च्या आवारात सुमारे आठशे रुग्णांच्या व्यवस्थेचे जम्बो कोविड केअर सेंटर सुरू होऊन आता आठवडा होईल. तरीही, अत्यवस्थ रुग्णांना दाखल करून घेण्यापासून त्यांच्या उपचार करण्यास यंत्रणा टाळाटाळ करीत आहेत. रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे डोळ्यादेखत दिसूनही त्यांना दाखल करून घेतले जात नसल्याच्या प्रचंड तक्रारी आहेत. त्यामुळे जम्बोच्या दारात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांचे अतोनात हाल होत आहेत.

अशा अवस्थेतील दोन रुग्णांना 'जम्बो'त आपला जीव गमावावा लागल्याच्या घटना रविवारी (ता.३०) दुपारी घडल्या. तेथील उपचार व्यवस्थेच्या बेजबाबदारपणामुळे या घटना घडल्याचे स्पष्ट आहे. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर जागे झालेल्या महापालिकेने 'जम्बो'च्या उभारणीत सहभाग असलेल्या 'पीएमआरडीए'सह वेगवेगळी जबाबदारी सोपविलेल्या एजन्सी, ठेकेदार कंपन्यांना बोलावून कानउघाडणी केली आहे. त्याचवेळी सध्या जम्बोत नेमके किती डॉक्‍टर, नर्स आणि अन्य कर्मचाऱ्यांची माहितीही अग्रवाल यांनी मागविली आहे. 

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल म्हणाल्या, "जम्बोतील सुविधांचा आढावा घेतला आहे. अत्यवस्थ रुग्णांना गरजेनुसार ऑक्‍सिजन आणि व्हेंटिलेटर पुरविण्याची सूचना केली आहे. या उपचारासाठी पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ ठेवा, रुग्णांना अत्यावश्‍यक सुविधांचा दर्जा सांभाळण्याकडे लक्ष देण्याची सूचना केली आहे. त्याशिवाय, संशयित म्हणजे, तपासणी न केलेल्या मात्र उपचारासाठी आलेल्या रुग्णांसाठी १५ बेड राखीव ठेवल्या जाणार आहेत. त्यांची तपासणीही केली जाणार आहे.'' 

योग्य उपचाराअभावी दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचीही महापालिकेने गंभीर दखल घेतली असून, या घटना कशा घडल्या? याचाही अहवाल मागविला आहे, असे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले. एक महिलेसह पुरुष रुग्णाला वेळेत आणि योग्य उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी 'सीओईपी'मधील जम्बो कोविड सेंटरमध्ये घडली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com