दारुड्यांची गर्दी खेचणाऱ्या 'वाईन शॉप'ला अतिरिक्त आयुक्तांनी ठोकले टाळे

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 September 2020

महापालिकेच्या मुख्य इमारतीसमोरील 'वॉईन शॉप'भोवती सकाळपासून लोकांची गर्दी असल्याची बाब महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या निदर्शनास गुरुवारी (ता.१७) आली.

पुणे : पुणेकरांचा कोरोनापासून बचाव व्हावा, म्हणून कठोर उपाय करणाऱ्या महापालिकेच्या इमारतीसमोरची प्रचंड गर्दी; ती म्हणजे, 'वॉईन शॉप'भोवतीचा गराडा...तिथे कुठेच 'सोशल डिस्टन्सिंग' दिसत नव्हते. काहींनी तर तोंडाला मास्कही बांधला नव्हता. हे सगळे चित्र सकाळच्या वेळेतले....तेवढ्यात महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवालांची गाडी आली अन् त्यांनी सारी गर्दी टिपली...गर्दीच्या बेशिस्तपणाने अवाक झालेल्या अग्रवाल यांनी काही मिनिटांतच दारुड्यांची गर्दी खेचणाऱ्या त्या 'वाईन शॉप'ला टाळे ठोकले. 'शिस्तीत दुकान उघडण्याची आणि 'सोशल डिस्टन्सिंग' पाळण्याची तंबीही 'वॉईन शॉप' मालकाला दिली...तरीही तिथे गर्दी दिसली; तीही 'वॉइन शॉप' बंद झाल्याने ! 

'तुझी लाज वाटते कंगना'; लेफ्टनंट जनरल डॉ. कानिटकरांचं ट्विट व्हायरल

कोरोनाला लगाम घालण्यासाठी महापालिकेची यंत्रणा अहोरात्र झटून प्रयत्न करीत आहे. मात्र, हा संसर्ग कमी होण्याचे नाव घेईनासा झाला आहे. त्यावर आता नव्याने उपाय आखून बाजारपेठा आणि रस्त्यांवर बेजबाबदारपणे फिरणाऱ्यांवर महापालिकेची नजर आहे. अशा लोकांवर बंधने घालून गर्दीला रोखण्याच्या महापालिकेच्या हालचाली आहेत. परंतु, दुकानदारांकडून तशी काळजी घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्‍वभूमीवर व्यवहार सुरू ठेवताना ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचा आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी बुधवारी (ता.१६) दिला आहे.

व्हॉट्सअॅपमुळे सापडली 'ती' चिमुकली!​

तेव्हाच, महापालिकेच्या मुख्य इमारतीसमोरील 'वॉईन शॉप'भोवती सकाळपासून लोकांची गर्दी असल्याची बाब महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या निदर्शनास गुरुवारी (ता.१७) आली. त्यानंतर आयुक्त विक्रम कुमार यांच्या आदेशाचा दाखल देत, संबंधित 'वॉईन शॉप' सील करण्याचा आदेश अग्रवाल यांनी काढला. आदेशावर सही करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पाठवून प्रत्यक्ष कार्यवाहीची व्यवस्थाही अग्रवाल यांनी केली. यानिमित्ताने 'सोशल डिस्टन्सिंग'चा फज्जा उडविणाऱ्या व्यावसायिकांना इशाराच दिला. अशा प्रकारची कारवाई नियमित होणार असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. 

अग्रवाल म्हणाल्या, ''लोकांची गर्दी होऊ नये, यासाठी काही उपाय ठरवून दिले आहेत. मात्र, ते अमलात येत नाहीत. त्यामुळे त्या-त्या परिसरांमधील नागरिकांना धोका निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे गर्दी करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करीत असून, थेट दुकान 'सील' केले जाईल.''

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMC Additional Commissioner Rubal Agarwal took action against a wine shop