आता आमदार-खासदारांना दररोज मिळणार पुण्यातील कोरोनाचे अपडेट्स!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 May 2020

नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यातही लोकप्रतिनिधी प्रशासनाला मदत करू शकतील.

पुणे : शहरातील कोणत्या प्रभागात कोरोनाची सद्यस्थिती काय आहे, याची अचूक शास्त्रीय सांख्यिकी माहिती (जीआयएस डेटा) नगरसेवक, आमदार आणि खासदार यांना नियमितपणे देण्याचा निर्णय महापालिका आणि स्मार्ट सिटी प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे त्या-त्या प्रभागांत लोकप्रतिनिधींना नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करता येणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोनाची शहरातील सद्यस्थिती आणि नजीकच्या काळात त्याचा सामना कसा करायचा, या बाबत खासदार वंदना चव्हाण यांच्या पुढाकाराने, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्मार्ट सिटीच्या कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये यासंदर्भात गुरुवारी बैठक आयोजित केली होती. "कोरोनाचे संशयित आणि पॉझिटिव्ह रूग्ण यांचे प्रभागनिहाय तपशील उपलब्ध झाल्यास त्यानुसार प्रशासनाच्या मदतीने लोकप्रतिनिधींना उपाययोजना करता येतील, तसेच नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यातही लोकप्रतिनिधी प्रशासनाला मदत करू शकतील,' अशी भूमिका खासदार चव्हाण यांनी मांडली.

- हृदय पिळवटून टाकणारी कहाणी : '...ते माहीत नाही, पण आमचे मात्र कुटुंब उद्‌ध्वस्त झाले'

त्यावर आयुक्त गायकवाड यांनी किती नागरिकांच्या तपासण्या झाल्या, त्या कोणत्या भागात झाल्या, त्यात संशयित, पॉझिटिव्ह यांची संख्या किती आहे, त्यांचा वयोगट कोणता आहे आदींचा तपशील असलेली अचूक शास्त्रीय सांख्यिक माहिती (जीआयएस डेटा) लोकप्रतिनिधींना देण्यात येईल, असे सांगितले.

प्रतिबंधित क्षेत्राबाहेर पुरेशी काळजी घेऊन जनजीवन सुरळीत करण्यासाठी महापालिकेने पोलिस प्रशासनाशी संवाद साधावा असे देखील यावेळी सूचविण्यात आले. क्वारंटाईन सेंटरमधील मूलभूत सुविधा- त्यातील कमरता, त्यासाठीच्या उपाययोजना, चाचणी अहवालातील विलंब, डॉक्‍टर-कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या, पीपीई किट, विविध शासकीय यंत्रणांमधील समन्वय तसेच महापालिकेचे कर्मचारी कोरोनामुळे बाधित होत आहेत. त्यासाठी त्वरित खबरदारी घेणे, असे विविध मुद्देही यावेळी उपस्थित करण्यात आले.

- पुणे : दारूच्या होम डिलिव्हरीबाबत मोठी बातमी...

या सर्व मुद्दयांसंदर्भात आढावा घेऊन आवश्‍यक त्या उपाययोजना करण्याबाबत आयुक्त गायकवाड यांनी सकारात्मकता दर्शवली व तसेच क्वारंटाईन सेंटरमध्ये पुरेशा सुविधा पुरविण्यात येतील, असे यावेळी सांगितले. तसेच त्याबाबत कार्यवाहीचे देखील आदेश दिले. यावेळी माजी महापौर अंकुश काकडे, दत्ता धनकवडे, आमदार चेतन विठ्ठल तुपे, सुनील टिंगरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, तसेच शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, मनसेचे गटनेते वसंत मोरे, बाबा धुमाळ उपस्थित होते.

- महत्वाची बातमी : कोरोना उद्रेकात मधुमेह रुग्णांसाठी मधुमेहतज्ज्ञांचा 'हा' सल्ला

महापालिकेची आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी, सामुदायिक मदतीची आवश्‍यकता आहे. यासाठी विविध सामाजिक संस्था यांचे सहकार्य घेणे महत्वाचे आहे. त्यासाठी धर्मादाय आयुक्तांसोबत बैठक घ्यावी, अशी सूचना काकडे आणि शिंदे यांनी केल्या. तसेच प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागनिधीतून उपलब्ध झालेल्या रुग्णवाहिकांचा प्रशासनाने उपयोग करून घ्यावा, असे आवाहन शिंदे यांनी केले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

कोरोनाच्या रुग्णांची संख्या नियंत्रित करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. यात प्रामुख्याने घराबाहेर पडू नये,
मास्क वापरणे, सोशल डिस्टंन्सिंगचे नियम पाळण्याचे आवाहन देखील यावेळी चव्हाण यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMC and Smart City have decided to provide corona updates of Pune city to Corporator, MLA and MP