पुणेकरांनी थकवले महापालिकेचे १२०० कोटी; माहिती अधिकारातून समोर आली माहिती

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 26 September 2020

पाटबंधारे खात्याने मिळकतकराची 53.31 कोटी रक्कम थकविली आहे. यासाठी महापालिकेने ही रक्कम पाटबंधारे विभागाला देत असलेल्या पाणीपट्टीमधून करणे वजा करणे आवश्‍यक आहे. ​

पुणे : पुणे महापालिकेने 50 लाखापेक्षा कमी मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या थकबाकीदारांसाठी 'अभय' योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे, पण पुण्यातील 474 जणांकडे एक कोटीपेक्षा जास्त कर थकीत असून, त्याची रक्कम तब्बल 1 हजार 218 कोटी रुपये आहे. महापालिकेने विशेष मालमत्ता कर व विधी विभागाची विशेष समिती नियुक्त करून ही थकबाकी वसूल करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे.

लग्न की करिअर ? मुलींपुढे पडला प्रश्‍न​

सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी मालमत्ता कर विभागाला 1 कोटी रुपयांच्यापेक्षा जास्त रक्कम थकविलेल्या मालमत्ताधारकांची यादी माहिती अधिकारात मागविली होती. त्यातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

474 जणांनी 1 हजार 218 थकविले आहेत. यामध्ये 50 जणांनी न्यायालयात खटले दाखल केले असून, त्यात 375 कोटी रुपये थकले आहेत. त्यातील फक्त दोघांची रक्कम 221 कोटी रुपये आहे. मोबाईल टॉवरच्या 273 केस असून, त्यात 390 कोटी रुपये अडकले आहेत. ही प्रकरणे पण हाय कोर्टात प्रलंबित आहेत.

'तेलंही गेलं अन् तूपही गेलं'; कर्ज मिळालं नाहीच, पण हातचे गमावले १५ लाख

शासकीय थकबाकीही मोठी
पाटबंधारे खात्याने मिळकतकराची 53.31 कोटी रक्कम थकविली आहे. यासाठी महापालिकेने ही रक्कम पाटबंधारे विभागाला देत असलेल्या पाणीपट्टीमधून करणे वजा करणे आवश्‍यक आहे. या संबंधी मालमत्ता कर विभागाने पाणीपुरवठा विभागाला पत्र लिहिले असले तरी याकडे लक्ष देण्यात आले नाही. तसेच संरक्षण खाते, बीएसएनएल, महावितरण, आयसर या सारख्या संस्थांकडे जवळपास 50 कोटी रुपयांची थकबाकी आहे. अनेक थकबाकीदारांची प्रकरणे कोर्टात प्रलंबित नसल्याचे दिसत आहे, अशा थकबाकीदारांकडून तत्काळ वसुलीचे प्रयत्न होण्याची गरज आहे.

कोरोनामुळे महापालिकेचे उत्पन्न घटलेले असताना महापालिकेने 50 लाखांखालील थकबाकीदारांना अभय योजना लागू करण्याआधी, 1 कोटी पेक्षा जास्त थकविणाऱ्यांवर संपूर्ण लक्ष केंद्रित करून वसुलीसाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी विवेक वेलणकर यांनी केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMC decided to implement Abhay scheme for those who are in arrears of property tax