भगवा फडकणार;  उमेदवारांचा निर्धार

भगवा फडकणार;  उमेदवारांचा निर्धार

वडगाव शेरी - सत्ताधाऱ्यांकडे विकासाची दृष्टी नसल्याने खराडीचा विकास खुंटला असून, जनता त्रस्त झाली आहे. यामुळे खराडीत यंदा शिवसेनेचा भगवा झेंडाच फडकेल, असा निर्धार करत शिवसेनेच्या चारही उमेदवारांनी रणशिंग फुंकले आहे. शिवसेनेने प्रचाराला जोरदार सुरवात केली असून, घराघरांत पोचण्याची व्यूहरचना आखली आहे. 

खराडी- चंदननगर- गणेशनगर प्रभागातील  (प्रभाग ४) शिवसेनेचे उमेदवार संतोष दादाभाऊ भरणे, संध्या धनाजी पठारे, मीनाक्षी सुरेश शेजवळ आणि सुनील साधू थोरात यांनी प्रचाराचे श्रीफळ वाढवून ग्रामदैवत श्री काळभैरवनाथाचे दर्शन घेतले. या वेळी शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी धीरज पठारे, गुलाब पठारे, सुरेश शेजवळ, साधुतात्या थोरात, दिलीप शेजवळ, राकेश पठारे, स्वप्नील पठारे, कानिफ भरणे, मारुतराव देशमाने, महिला व तरुण कार्यकर्ते, खराडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संतोष भरणे म्हणाले, ‘‘खराडीतील रखडलेले विकास प्रकल्प शिवसेना मार्गी लावेल. खराडीतील शेकडो कंपन्यांमध्ये स्थानिक तरुणांना 

रोजगार आणि महिलांना स्वयंरोजगार प्रशिक्षण दिले जाईल. स्वच्छव सुरक्षित खराडी हे शिवसेनेचे स्वप्न आहे.’’

घोषणांमुळे  परिसर दणाणला
हातात भगवे झेंडे घेऊन ‘जय भवानी, जय शिवाजी’, अशा घोषणा देत तरुणांनी खराडी परिसर दणाणून सोडला. तरुणांच्या प्रतिसादाने आणि शिरूर, नगर, मराठवाडा, खानदेश आदी भागांतील नागरिकांच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेचा उत्साह वाढला आहे.

डेक्कन-मॉडेल कॉलनीत वैयक्तिक प्रचारावर भर
पुणे - 
आजी हाताचा पंजा लक्षात ठेवा... आशीर्वाद असू द्या... काँग्रेसच्या आपल्या माणसांना निवडून देऊन विकास करण्याची संधी द्या... अशी साद घालत पुणे महापालिकेच्या निवडणुकीत डेक्कन जिमखाना-मॉडेल कॉलनी (प्रभाग क्रमांक १४) मधून काँग्रेसला विजयी करण्याचे आवाहन काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांनी बुधवारी केले. पक्षाच्या अधिकृत उमेदवार आयशा अजीज सय्यद, उपमहापौर मुकारी अलगुडे, मयूरी शिंदे आणि नारायण पाटोळे यांनी शिवाजीनगर गावठाण आणि मॉडेल कॉलनी परिसरात मतदारांशी संवाद साधला.

शिवाजीनगर गावठाणातील शिरोळे गल्ली, बहिरट गल्ली, मॉडेल कॉलनीतील यशोदा हाउसिंग सोसायटी, नालंदा बुद्ध विहार परिसरात फिरून उमेदवारांनी निवडून देण्याचे आवाहन केले. बुद्ध विहार परिसरात वृद्ध महिला व गृहिणींनी येथील मुलांना रोजगार, महिलांच्या हाताला काम द्यावे, अशी मागणी केली. तसेच या भागातील रस्त्याच्या, पाण्याच्या समस्या मांडल्या. उमेदवारांनी कौशल्य विकास कार्यक्रम, रोजगार मेळावे, शिलाई मशिन वाटप, बचत गट आदींच्या मार्फत हे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले. लक्ष्मण कदम, राहुल वंजारी, पूनम वंजारी, रूपेश गायकवाड, अजित गोगावले, क्रांती सोनावणे, जया बाबर, फरिदा खान यांच्यासह अनेक कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. त्यांनी उमेदवारांना विजयी करून द्या, अशा घोषणा दिल्या.

आघाडीचा संयुक्त प्रचार सुरू
कोथरूड - ‘‘मदतीला धावून जाणारे कार्यकर्ते म्हणून माझी आणि रामचंद्र ऊर्फ चंदूशेठ कदम यांची नागरिकांमध्ये ओळख आहे. आम्ही पाच वर्षे काम करून नागरिकांच्या संपर्कामध्ये असल्याने सोसायट्या आणि वस्त्या-वस्त्यांतील नागरिक आमच्या सोबत आहेत,’’ असा विश्‍वास प्रभाग क्रमांक ११ रामबाग कॉलनी-शिवतीर्थनगर प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दीपक मानकर यांनी व्यक्त केला.

रामबाग कॉलनी शिवतीर्थनगर प्रभाग क्रमांक ११ मधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीच्या प्रचाराचा प्रारंभ पौड रस्त्यावरील केळेवाडीमधून करण्यात आला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मानकर, अश्‍विनी जाधव आणि काँग्रेसचे उमेदवार चंदुशेठ कदम, वैशाली मराठे यांनी केळेवाडी, जयभवानीनगर, किष्किंधानगर परिसरामध्ये पदयात्रा काढून प्रचाराचा प्रारंभ केला. या वेळी विविध ठिकाणी नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत, औक्षण करीत आघाडीच्या सर्व उमेदवारांचे स्वागत केले. 
मानकर म्हणाले, ‘वस्ती विभागात आणि सोसायटी विभागामध्ये माझा वैयक्तिक जनसंपर्क आहे. प्रभागातील नवीन भागामधील नागरिकही रामचंद्र कदम यांच्या आणि माझ्या सोबत आहेत. कोथरूड कचरा डेपोच्या जागेवर भव्य शिवसृष्टी उभारण्याचे काम मी करणार आहे. गेल्या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये माझ्या प्रभागातील रस्ता, पाणी, कचरा, सांडपाणी या मूलभूत सुविधा सोडविण्यात आल्या आहेत. माझ्या प्रभागामध्ये वस्ती विभाग मोठ्या प्रमाणात असुनही उत्कृष्ट नियोजनामुळे हा प्रभाग आदर्श प्रभाग म्हणून ओळखला जातो. परिसरातील मोकळ्या आरक्षित जागा ताब्यात घेऊन त्यावर उद्यान विकसित करण्यात येणार आहे.’’

‘‘कोथरूड परिसरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी पौड फाटा ते बालभारती दरम्यानच्या पर्यायी रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. माँसाहेब जिजाऊ रस्त्यावरील (पौड रस्ता) अपघात टाळण्यासाठी रस्ता दुभाजकाचे काम पूर्ण करून संपूर्ण रस्त्यावर एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत,’’ असेही मानकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com