पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा... 

- फिरस्ता 
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

"अप्पर'च्या ओट्यावर सकाळच्या कोवळ्या उन्हात बाळाबाई आणि कमळाबाई हातात नव्या कोऱ्या साड्या घालून एकमेकींशी सं"वाद' साधत होत्या. चर्चेचा विषयही तसाच ताजा होता. सध्या कोठेही जा विषय एकच. आज कोणी काय वाटले. पुणेकरांची तशी दिवाळीपासूनच "दिवाळी' सुरू आहे. त्यामुळे परिचय पत्रकासोबत काय आले याची घराघरांत चर्चा रंगलेली दिसते; पण अप्परच्या ओट्यावर सध्या दोन दिवसांपासून प्रत्येक घरात आलेल्या नव्या करकरीत साड्यांचीच चर्चा आहे, अन्‌ बाळाबाई आणि कमळाबाई त्यावरच आपलं परखड मत नोंदवीत होत्या. 

गणेशभाऊंनी साड्या वाटल्याचे समजताच वरच्या भागातील बाळाभाऊंचाही साड्यांचा ट्रकच ओट्यावर आला आणि रातोरात घराघरांत साड्यांचे वाटप झाले. त्यामुळे रात्री वाटलेल्या साड्यांवर सकाळी-सकाळी चर्चा होणे साहजिकच होते. कमळाबाईंनी एकदम ठसक्‍यात गणेशभाऊंनी दिलेली साडी बाळाबाईच्या पुढे टाकली आणि म्हणाली,""बघ याचा काट, पदर आणं काल रात्री आलेल्या साडीचा बघ. एकतर पाच वर्षांत कधी फिरकायचं नाय आणि वरून पाच वर्षांतनं एक साडी दिली, ती पण असली. आम्ही काय, मागायला आलो होतो वयं ह्यांच्या दारात.'' 

बाळाबाई सारवासारव करीत म्हणाल्या, ""कमळे उगाचं नको लयं उड्या मारू, गणेशभाऊ पइल्यांदाच निवडणुकीत उतारल्यात. बक्कळ माल आहे त्यांच्याकडं. त्यात "ताई'चा आशीर्वाद, अजून काय हवं. आता वाटणारंच ते, घ्या हात धुऊन नंतर बसा बोंबलंत.'' 

आता कमळबाईंचा तोल सुटला. "बाळे, गेली पाच वर्षे वहिनीच हुती नगरसेविका, काय केलं. तिळगुळाच्या पुड्या आणि ही असली साडी. जाऊदे पण आपण कशाला भांडत बसायचयं. जे देतील ते घ्यायचं ठेवून. आता या साड्या नेसण्यासारख्या नाहीत किमान इतर कुणाला नेसवायच्या तरी कामात येतील.' साड्यांवरची चर्चा रंगत रंगत पिंटूभाऊंच्या काचेच्या बाउलवर येऊन ठेपली. 

या भाऊच्या बाउलमध्ये दुसऱ्या एका भाऊनं दिलेला एक किलो गूळ ठेवलाय, हे सांगायला कमळाबाई विसरली नाही, अन्‌ हो काचेच्या बाउलवाला भाऊ यंदा ताईला उभं करणार आहे, त्यामुळे "पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, ताई तू नेसव शालू नवा' असे म्हणू. बघू या दोघांपेक्षा जरा चांगली साडी मिळते का? दोघींचे यावर कधी नाही ते एकमत झालं आणि एका "भाऊ'ने स्वस्तात विकायला ठेवलेला भाजीपाला घ्यायला निघून गेल्या. 

Web Title: pmc election politics

टॅग्स