#PMCIssue आपत्ती व्यवस्‍थापनाचा प्रश्‍न कायम

PMC Issue
PMC Issue

पुणे - महापालिकेत दीड वर्षापूर्वी अकरा गावे समाविष्ट करण्यात आली. मात्र, या गावांत आगीच्या घटना घडल्यास त्या विझवणार कोण, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. कारण, या गावांत अग्निशमन केंद्रे उभारण्यासाठी महापालिकेकडून कोणत्याही हालचाली केल्या जात नसून, आपत्ती व्यवस्‍थापनाचा प्रश्‍न कायम आहे.

राज्य सरकारने ४ ऑक्‍टोबर २०१७ रोजी उरळी देवाची, फुरसुंगी, लोहगाव, शिवणे, उत्तमनगर, मुंढवा, साडेसतरानळी, आंबेगाव खुर्द, उंड्री, धायरी, आंबेगाव बुद्रुक या गावांचा महापालिकेत सहभाग करून हद्दवाढ केली. यानंतर अग्निशामक विभागाने बांधकाम विभागास पत्र लिहून या समाविष्ट गावात अग्निशामक दलासाठी जागा ताब्यात घ्याव्यात, असे पत्र दिले होते; परंतु गेल्या दीड वर्षापासून यासाठी काहीही हालचाल झालेली नाही. गावे समाविष्ट झाल्याने पुण्याची हद्द ८१ चौरस किलोमीटरने वाढलेली आहे. त्यामुळे अग्निशमन केंद्रांवरील ताण वाढलेला आहे. 

आवश्‍यक सुविधा 
केंद्र शासनाच्या स्टॅंडिंग फायर ॲडव्हायझरी कमिटीने ठरवून दिलेल्या नियमानुसार एका अग्निशमन केंद्रासाठी दोन गॅरेज, कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी जागा, अधिकाऱ्यांचे निवासस्थान, एक बंब, एक टॅंकर असला पाहिजे. एका पाळीसाठी एक चालक, एक तांडेल, किमान सात जवान आवश्‍यक असतात, म्हणजे २४ तासांसाठी किमान २७ कर्मचारी लागतात. तरच अग्निशामक दल सक्षमपणे चालविता येते. 

सहा केंद्रे प्रस्तावित  
पुण्यात मध्यवर्ती केंद्र, हडपसर, पुणे स्टेशन, येरवडा, कसबा, एरंडवणे, औंध, कात्रज, सिंहगड रस्ता, कोथरूड, पाषाण, कोंढवा खुर्द, कोंढवा बुद्रुक, जनता वसाहत ही केंद्रे कार्यरत आहेत. खराडी, धानोरी, महंमदवाडी, काळेपडळ, धायरी, वारजे, कोथरूड येथे नवीन केंद्रे प्रस्तावित आहेत. यापैकी धानोरी, काळेपडळ, महंमदवाडी येथील काम सुरू आहे. एक अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी किमान एक कोटी खर्च येतो.

कर्मचाऱ्यांची दमछाक 
अग्निशामक दलासाठी ९१० पदे मंजूर आहेत. त्यातील ४४४  पदे भरलेली आहेत. तर, ४६६ जागा रिक्त आहेत. रोज अनेकांच्या सुट्या, रजा यामुळे एका दिवशी तिन्ही पाळ्या मिळून सुमारे ३०० जणच कामावर असतात. 
त्यामुळे एकाच वेळी दोन- तीन घटना घडल्या, उपनगरांमध्ये मोठी आग लागल्यावर इतर अग्निशमन केंद्रांवरून बंब मागवून घ्यावे लागत असल्याने अग्निशामक दलाची दमछाक होते.

महापालिकेत गावे आल्यानंतर गावांचा विकास होईल, असे वाटले होते. पण, काहीच कामे केली जात नाहीत. यांना गावांचे काही देणे-घेणे नाही, असा कारभार आहे. 
- श्रीरंग चव्हाण, हवेली तालुका नागरिक कृती समिती

महापालिकेत समाविष्ट झालेल्या ११ गावांत अग्निशमन केंद्रांसाठी जागा आवश्‍यक आहे. त्या ताब्यात घेण्यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे. अग्निशमन दलाच्या सेवा नियमावलीस अद्याप मंजुरी मिळाली नसल्याने भरती प्रक्रिया झालेली नाही.  
- प्रशांत रणपिसे, प्रमुख, अग्निशमन विभाग

नवीन ११ गावांचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये अग्निशमन केंद्रांसाठी आरक्षणे टाकली जातील. 
- प्रशांत वाघमारे, शहर अभियंता, पुणे महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com