#PMCIssue पावसाळी गटारांना प्लॅस्टिकचा महापूर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

चेंबरवरील झाकणे मोडकळीस
पावसाळी गटारांसह सांडपाणी वाहिन्यांच्या चेंबरवरील लोखंडी आणि सिमेंटची झाकणे मोडकळीस आली आहेत. त्याचा परिणाम ही झाकणे धोकादायक झाली असून, त्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. तरीही झाकणांची नुकतीच दुरुस्ती केल्याचा दावा महापालिका प्रशासन करीत आहे. सध्या शहरात सुमारे ५५० झाकणे धोकादायक असून, त्यांची दुरुस्ती करणे अपेक्षित असल्याचा महापालिकेचा अहवाल आहे.

पुणे - पावसाळी गटारांचा शोध घेण्याचा प्रयत्न महापालिका करीत असतानाच गटारांत प्लॅस्टिकचा महापूर असल्याचे महापालिकेलाच कळून चुकले. गटारांत प्रचंड प्रमाणात प्लॅस्टिकचा कचरा टाकल्याने ती तुंबल्याचा खुलासा महापालिका करीत आहे. त्यावरून पावसाळी गटारांची सफाई झाली नसल्याची वस्तुस्थितीच महापालिकेच्या खुलाशामुळे उघड झाली आहे.

वाहनांची वर्दळ असलेले प्रमुख रस्ते, बाजारपेठा आणि लोकवस्त्यांमधील पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी महापालिकेने विविध भागांत पावसाळी गटारांचे जाळे उभारले आहे. शहरात सध्या ८५८ किलोमीटर लांबीची गटारे आहेत. ती भूमिगत असल्याने पावसाळ्याआधी आणि त्यानंतर दोनदा अशा प्रकारे वर्षातून तीन वेळा गटरांची दुरुस्ती अपेक्षित आहे. त्यासाठी वर्षाला साधारणपणे आठ ते दहा कोटी रुपयांच्या निविदा काढून कामांना मुंजरी घेतली जाते. त्यानुसार गटारांची कामे करण्याची जबाबदारी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांकडे सोपविण्यात आली आहे.

परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून गाळ साचल्याने गटारे पूर्णपणे गाळात अडकली आहेत. त्यामुळे त्यातून पाणी वाहून जाण्यास कुठेच मार्ग नसल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले होते. पावसाळी गटारे सक्षम आणि पुरेशी नसल्याचे वृत्त ‘सकाळ’ने रविवारी प्रसिद्ध केले आणि त्यानंतर काही तासांतच क्षेत्रीय कार्यालयांनी पेठांच्या परिसरात आपली यंत्रणा लावून गटारे साफ करण्यास सुरवात केली. तेव्हा बहुतांश गटरांत प्लॅस्टिकचा कचरा विशेषत: बाटल्या सापडल्याचे दिसून आले आहे. हीच परिस्थिती जवळपास अडीचशे ते पावणेतीनशे किलोमीटर लांबीच्या गटारांची असल्याचा अंदाज कामगारांचा आहे. त्यामुळेच पाणी वाहून जात नसल्याचे त्यांनी सांगितले.

पावसाळ्याआधी गटारांतील गाळ काढून ती साफ करण्यात आली आहेत. मात्र, काही भागांतील गटारांत प्लॅस्टिकचा कचरा टाकण्यात आला आहे. त्यामुळे गटारांतील पाणी पुढे सरकण्यास अडथळे निर्माण होत आहेत. मात्र, आता नव्याने कामे होत आहेत.
- राजेश बनकर, सहायक आयुक्त, पुणे महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMC Issue Rain Flood Dranage Plastic