#PMCIssues सायकल खरेदीला ‘ब्रेक’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

महापालिकेने आखलेल्या सायकल योजनेला पुणे स्मार्ट सिटी डेव्हल्पमेंट कॉर्पोरेशनने (पीएसडीसी) ‘ब्रेक’ लावला आहे. जुन्या सायकली खरेदी करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव ‘पीएसडीसी’ने धुडकावून लावला आहे. त्यामुळे जुन्या सायकलींवरील सुमारे ६ कोटी रुपयांचा खर्च थांबणार आहे. त्याच वेळी सायकल योजनेसाठी नियोजित केलेल्या सायकल ट्रॅकच्या कामाचे काय होणार, असा प्रश्‍नही उपस्थित झाला आहे.

पुणे - महापालिकेने आखलेल्या सायकल योजनेला पुणे स्मार्ट सिटी डेव्हल्पमेंट कॉर्पोरेशनने (पीएसडीसी) ‘ब्रेक’ लावला आहे. जुन्या सायकली खरेदी करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव ‘पीएसडीसी’ने धुडकावून लावला आहे. त्यामुळे जुन्या सायकलींवरील सुमारे ६ कोटी रुपयांचा खर्च थांबणार आहे. त्याच वेळी सायकल योजनेसाठी नियोजित केलेल्या सायकल ट्रॅकच्या कामाचे काय होणार, असा प्रश्‍नही उपस्थित झाला आहे.

शहरात लोकांना प्रवासासाठी सहजरीत्या सायकल उपलब्ध व्हावी, या हेतूने पुणेकरांना एक लाख सायकली पुरविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यापैकी सुमारे आठ हजार सायकली दीड वर्षापूर्वी आणल्या गेल्या. या योजनेचा प्रचंड गाजावाजा करीत तिला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे महापालिका आणि ‘पीएसडीसी’ने कागदोपत्री दाखविले. प्रत्यक्षात ही योजना पूर्णपणे फसली. योजनेतील बहुतांशी सायकली खराब झाल्या, तर काही सायकली चोरीला गेल्या आहेत. त्यानंतरही योजनेची व्याप्ती वाढविण्याचे नियोजन करीत महापालिकेने पहिल्या टप्प्यात फुकटात मिळालेल्या सायकली विकत घेण्याचे नियोजन केले.  

या पार्श्‍वभूमीवर या सायकली सहा कोटी रुपयांत विकत घेण्याबाबत महापालिका प्रशासनाने ‘पीएसडीसी’कडे निधीची मागणी केली. त्यावर आधीच्या सायकलींचा हिशेब लागत नाही, तोपर्यंत सायकली खरेदीला पैसे देता येणार नाहीत, असे ‘पीएसडीसी’ने महापालिकेला कळविले आहे. सायकल धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महापालिका सायकल खरेदीवर ठाम असली, तरी त्या खरेदी न करण्याबाबत ‘पीएसडीसी’नेही भूमिका घेतली आहे. 

शहरात सायकल योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यासाठी प्रमुख रस्त्यांवर नवे सायकल ट्रॅक उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी दोन वर्षांत ११० कोटी रुपये देण्यात आले; परंतु त्यातून कुठे आणि कसे काम सुरू आहे, हेच दिसत नाही. त्यामुळे महापालिकेचे सायकल धोरण फसल्याची टीका सर्वपक्षीय नगरसेवक करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMC Issues Cycle Purchasing Stop Municipal