महापालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय "कागदावरच'! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

पुणे - शहरात आरोग्यसेवेसह बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या धर्तीवर पुणे महापालिकेच्या वतीने वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा महापालिकेने चार वर्षांपूर्वी केली होती. त्यावर महापालिका प्रशासनाने कागदोपत्री एका सल्लागाराची नेमणूक केली असून, संबंधित सल्लागाराने अद्याप काम सुरू केले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

पुणे महापालिकेच्या हद्दीत शहर आणि उपनगरांमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानावर आधारित खासगी रुग्णालये तसेच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची संख्या मोठी आहे; परंतु सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात किंबहुना मोफत वैद्यकीय उपचार मिळावेत, या हेतूने चार वर्षांपूर्वी महापालिकेच्या वतीने वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यासाठी कमला नेहरू व डॉ. नायडू रुग्णालयांमध्ये पायाभूत सुविधा, यंत्रसामग्रीच्या उभारणीसह स्वतंत्र जागेत महाविद्यालयाची इमारत उभी करण्यासाठी काही कोटींच्या निधीची तरतूददेखील करण्यात आली होती; परंतु महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सत्तांतर झाल्यानंतर पूर्वीची घोषणा बासनात गुंडाळून ठेवण्यात आली. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने केवळ सल्लागाराची नेमणूक केली असून, त्या सल्लागाराकडून काम अद्याप सुरू झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

दरम्यान, या संदर्भात सहायक आरोग्य प्रमुख डॉ. वैशाली जाधव आणि सहायक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी याबाबत बोलण्यास असमर्थता दर्शवली. 

पुणे महापालिकेच्या वैद्यकीय सेवा 
वैद्यकीय सेवा संख्या 

सर्वसाधारण रुग्णालय - एक (कमला नेहरू रुग्णालय) 
संसर्गजन्य रोगांचे रुग्णालय - एक (डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालय) 
दवाखाने (बाह्यरुग्ण विभाग) - 44 
फिरते दवाखाने - 2 
प्रसूतिगृह - 17 
एकूण खाटांची संख्या - 1 हजार 106 
एकूण सेवक - 1 हजार 156 
बाह्यरुग्णांची संख्या - दररोज 6 ते 7 हजार 
आंतररुग्ण - सरासरी 100 ते 125 दररोज 

Web Title: PMC medical college on paper