पुणे महापालिकेचा भोंगळ कारभार; टेंडर काढलं, पण मर्जीतल्या ठेकेदारांना काम मिळेल असं!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 September 2020

शहरातील जलवाहिन्यांवरील वॉल्व्ह सोडण्यासाठी दरवर्षी महापालिकेकडून निविदा काढून काम दिले जाते. विशेष म्हणजे हे काम मुख्य खात्याऐवजी क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावरून केले जाते.

पुणे : 'पुणे महापालिकेच्या कामाचा अनुभव' हीच प्रमुख अट पाणी पुरवठ्यासाठी वॉल्व्हमन पुरविण्याच्या निविदेसाठी घालण्यात आली आहे. त्यामुळे यापूर्वीच्या ठेकेदारांना काम मिळेल, यासाठी प्रशासनाकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचे उघड झाले आहे. निविदांसाठी खुली स्पर्धा होऊ नये, मर्जीतील ठेकेदारालाच हे काम मिळावे, यासाठी ही अट निविदेत टाकण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. 

मराठा आंदोलनच्या घोषणांनी पुणे शहर दणाणले!​

शहरातील जलवाहिन्यांवरील वॉल्व्ह सोडण्यासाठी दरवर्षी महापालिकेकडून निविदा काढून काम दिले जाते. विशेष म्हणजे हे काम मुख्य खात्याऐवजी क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावरून केले जाते. त्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर दहा लाखांपर्यंतच्या या कामासाठीच्या निविदा काढल्या जातात. गेल्या वर्षीच्या कामाची मुदत मार्चमध्ये संपुष्टात आली. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जुन्याच ठेकेदाराला मुदत वाढ देऊन हे काम सुरू ठेवण्यात आले. मात्र, नुकत्याच या कामाच्या निविदा क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावरून काढण्यात आल्या.

संतापजनक! जम्बो कोविड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग; दोघा डॉक्टरांवर गुन्हा

निविदांच्या अटी-शर्ती ठरविताना मर्जीतील ठेकेदाराला हे काम कसे मिळेल, यांची विशेष काळजी घेण्यात आली. त्यासाठी 'पुणे महापालिकेच्या कामकाजाचा अनुभव' ही अट जाणीवपूर्वक घालण्यात आली. त्यामुळे दाखल झालेल्या अन्य ठेकेदारांच्या निविदा या अटी-शर्तींवरच बाद करण्यात आल्या. मात्र, तीन ठिकाणी एकही ठेकेदार पात्र झाला नाही, म्हणून पुन्हा फेरनिविदा ठेवून तीच अट कायम ठेवण्यात आली. जेणेकरून स्पर्धा होऊ नये, याची विशेष काळजी घेण्यात आली. 

वास्तविक ग्रामपंचायतीपासून नगरपालिका आणि महापालिकेच्या हद्दीमध्ये वॉल्व्हच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे निविदा काढताना शासकीय कामकाजाचा अथवा अन्य महापालिकेच्या कामकाजाचा अनुभव अशी अट टाकणे अपेक्षित आहे. तसे केले तर स्पर्धा झाली असती. परंतु स्पर्धा होऊ नये, यासाठी अशा प्रकारे विशेष काळजी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून घेतली जाते. 

Video : गुरगुरणाऱ्या चीनविरोधात शड्डू; 'एलएसी'वर भारतीय सैन्यासह टी-९० टँक तैनात

एरिया मिळविण्यासाठी स्पर्धा 
विशिष्ट परिसरात वॉल्व्ह सोडण्याचे काम मिळावे, यासाठी देखील वॉल्व्हमनला पैसे मोजावे लागतात. कारण सोसायट्यांकडून दरमहा एक ते दोन हजार रुपये या वॉल्व्हमनला मिळतात. जी सोसायटी पैसे देणार नाही, त्या सोसायटीला कमी पाणी कसे मिळेल, याची काळजी मग घेतली जाते. तक्रार आल्यानंतरही तो ठेकेदार अथवा त्यांच्या माणसांवर महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यास टाळाटाळ केली जाते. 

याबाबत माझ्याकडे देखील तक्रारी आल्या आहेत. त्याचा आढावा घेतला जाईल, आवश्‍यक त्या निविदेतील अटी-शर्ती बदलण्याचा निर्णय घेण्यात येईल. 
- अनिरूद्ध पावसकर (पाणी पुरवठा विभाग प्रमुख, पुणे महापालिका) 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMC water supply department issued new tender for supply of valve man