#PmcIssues अभ्यासिका बंद करण्याचा घाट!

PmcIssues
PmcIssues

पुणे - घरची परिस्थिती हलाखीची असल्याने अनेक मुलांना अभ्यासासाठी शिकवणी लावणे अशक्‍य असते. त्यांच्यासाठी महापालिकेच्या महर्षीनगर येथील शाळेत काही वर्षांपूर्वी सुरू झालेली मोफत अभ्यासिका ही आशेचा किरण निर्माण करणारी बाब ठरली. पण आता ही अभ्यासिका अखेरचा श्‍वास घेतेय! कारण महापालिकेने या अभ्यासिकेसाठी अवास्तव भाडे आकारून हा उपक्रम बंद करण्याचा घाट घातला आहे. यामुळे महापालिकेला गोरगरीब विद्यार्थी घडवायचे आहेत, की पैसे कमवायचे आहेत, असा प्रश्‍न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

महर्षीनगर येथील महापालिका शाळा (मुलांची) क्रमांक ७८ आणि ७३ या शाळेतील प्रत्येकी दोन वर्गखोल्यांमध्ये बाल शिक्षण मंचातर्फे २००६पासून मोफत अभ्यासिका सुरू आहे. इंदिरानगर, प्रेमनगर, मार्केट यार्ड, औद्योगिक वसाहत येथील असंघटित कामगारांची मुले या अभ्यासिकेत येतात. शाळेत दिलेला गृहपाठ, विद्यार्थ्यांचा वैयक्तिक अभ्यास, त्याचप्रमाणे इंग्रजी, गणित हे विषय पक्के करण्याचे काम येथे स्वयंसेवकांच्या साहाय्याने केले जाते. आतापर्यंत पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी अभ्यासिकेद्वारे शिक्षण घेतले आहे. या ठिकाणी अभ्यास करून रेणुका शिवसरण, ओमप्रकाश अंडिल अशी अनेक गरजू मुले शिकली व चांगल्या नोकरीला लागली. मात्र आता ही अभ्यासिका सुरू ठेवण्यासाठी शिक्षण मंचाकडे दर महिना दहा हजार रुपये भाडे महापालिकेकडून मागितले जात आहे. या संदर्भात महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

कायमस्वरूपी तोडगा कधी?
कोणत्याही आर्थिक पाठबळाशिवाय ही अभ्यासिका सुरू असल्याने संस्थेला हे भाडे देणे शक्‍य नाही. परिणामी अभ्यासिकेच्या अस्तित्वावर गदा येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. पावसाळ्यापुरती सोय म्हणून ही अभ्यासिका स्थानिक नगरसेविकेच्या पुढाकाराने संत नामदेव शाळेत सुरू आहे. मात्र अद्याप कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही, असे मंचाचे प्रमुख अमर पोळ यांनी सांगितले. 

वडील हॉटेलमध्ये वेटर म्हणून दिवसरात्र काम करायचे. परिस्थिती हलाखीची असल्याने शिकवणी लावणे अशक्‍य होते; परंतु मोफत अभ्यासिकेमुळे इंग्रजी, गणित आणि विज्ञान हे विषय पक्के झाले. पण आता अभ्यासिकेच्या अस्तित्वाचाच प्रश्‍न उपस्थित झाल्याने मन विचलित झाले आहे.
- गोपी पाटील, विद्यार्थी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com