पीएमपीच्या १० हजार फेऱ्या रद्द 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 जानेवारी 2019

पुणे - आयुर्मान संपलेल्या बसचा वापर वाढत असल्यामुळे त्या बंद पडण्याचे प्रमाण वाढत आहे. परिणामी पीएमपीच्या फेऱ्या रद्द होण्याचे प्रमाणही वाढले आहे. रविवारी (ता. २०) चार हजार ८४९ तर सोमवारी (ता. २१) चार हजार ९९३ बसच्या फेऱ्या रद्द झाल्या आहेत. त्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. एक महिन्यापासून दररोज सरासरी सुमारे चार हजार बसच्या फेऱ्या रद्द होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. 

पुणे - आयुर्मान संपलेल्या बसचा वापर वाढत असल्यामुळे त्या बंद पडण्याचे प्रमाण वाढत आहे. परिणामी पीएमपीच्या फेऱ्या रद्द होण्याचे प्रमाणही वाढले आहे. रविवारी (ता. २०) चार हजार ८४९ तर सोमवारी (ता. २१) चार हजार ९९३ बसच्या फेऱ्या रद्द झाल्या आहेत. त्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. एक महिन्यापासून दररोज सरासरी सुमारे चार हजार बसच्या फेऱ्या रद्द होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. 

पीएमपीच्या शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये प्रतिदिन सरासरी सुमारे २२ हजार फेऱ्यांचे नियोजन केले आहे. सोमवारी मात्र, १७ हजार ५३ फेऱ्या झाल्याची नोंद पीएमपीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यामुळे अनेक मार्गांवर प्रवाशांचे हाल होत आहेत. प्रवाशांची संख्या मात्र, सध्या ११ लाखांपेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे प्रवासी आहेत अन्‌ त्यांच्यासाठी बस अपुऱ्या पडत असल्याचे अधोरेखित झाले आहे. 

पीएमपीचे मुख्य अभियंता सुनील बुरसे म्हणाले,‘‘पीएमपीच्या ताफ्यातील सुमारे दोन हजार पैकी एक हजार ४५० बस सध्या रस्त्यावर धावत आहेत. बसची संख्या कमी पडत असताना, बंद पडणाऱ्या बसचे प्रमाण वाढू नये यासाठी दोन शिफ्टमध्ये प्रयत्न सुरू आहेत. काही बस जुन्या झाल्या आहेत. त्यांचीही नियमितपणे देखभाल दुरुस्ती करण्यात येत आहे. त्याही मार्गावर धावत आहेत.’’

ब्रेक डाऊनचे प्रमाण १०० वरून ७० झाले आहे. पीएमपीच्या सुमारे ३२५ बस कायमस्वरूपी बंद आहेत. उर्वरित सुमारे दोनशे बसची दुरुस्ती करून त्या मार्गावर धावतील, यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले.   

या बाबत पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक सुनील गवळी यांच्याकडे विचारणा केली असता, ‘‘बसच्या सध्या सुमारे २१ हजार फेऱ्यांचे नियोजन आहे. त्यातील १७ ते १८ हजार फेऱ्या होत आहेत. उपलब्ध बस जास्तीत जास्त धावतील, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, काही वेळा मर्यादा येत आहेत. या महिन्याच्या अखेरीस नव्या बस येत आहेत. त्यानंतर परिस्थितीत सुधारणा होईल,’’ असे त्यांनी  स्पष्ट केले. प्रवासी मंचचे मान्यवरांना साकडे पीएमपीच्या फेऱ्या मोठ्या प्रमाणात रद्द होत असल्यामुळे पीएमपी प्रवासी मंचने चिंता व्यक्त केली आहे. संघटनेतर्फे संजय शितोळे यांनी पीएमपीच्या अध्यक्ष, संबंधित अधिकारी तसेच प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष यांच्याकडे एक निवेदन दिले आहे. पीएमपीच्या गेल्या महिन्यापासून दररोज सुमारे चार हजार फेऱ्या रद्द होत आहेत. या घटत्या बस संख्येबाबत तातडीने उपाययोजना करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यात केली आहे. दरम्यान, याबाबत महापौर मुक्ता टिळक, संचालक सिद्धार्थ शिरोळे यांनाही मंचने साकडे घालत बस संख्या वाढण्याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, असे आवाहन केले आहे. 

Web Title: PMP 10 thousand rounds canceled