पीएमपी प्रवाशांचा दिलासा लांबला; 'डेली पास'चा निर्णय होणार पुढच्या बैठकीत

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 October 2020

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये प्रत्येकी 40 रुपयांच्या पासद्वारे दिवसभर पीएमपीबसमधून प्रवास करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मांडला होता. तर दोन्ही शहरांसाठी एकत्रित पास 50 रुपयांना करण्याचाही त्यात समावेश होता.

पुणे : शहरात 40 रुपयांच्या पासद्वारे पीएमपी बसमधून दिवसभर प्रवास करण्याचा प्रस्ताव कोणतेही ठोस कारण न देता पीएमपीच्या संचालक मंडळाने गुरुवारी (ता.1) पुढे ढकलला. तसेच एसी ई-बसच्या तिकीट दरात वाढ करण्याच्या प्रस्तावावरही कोणताही निर्णय झाला नाही, तर विमानतळाच्या बससेवेच्या दरांनाही मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे पीएमपीच्या प्रवाशांना दिलासा मिळू शकला नाही.

मराठा आरक्षणाविषयी पुण्यात 'विचार मंथन'; बैठकीला दिग्गज लावणार हजेरी!​

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये प्रत्येकी 40 रुपयांच्या पासद्वारे दिवसभर पीएमपी बसमधून प्रवास करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मांडला होता. तर दोन्ही शहरांसाठी एकत्रित पास 50 रुपयांना करण्याचाही त्यात समावेश होता. परंतु, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, दोन्ही महापालिकांच्या स्थायी समितीचे अध्यक्ष अनुक्रमे हेमंत रासने, संतोष लोंढे, संचालक शंकर पवार, आयुक्त विक्रमकुमार, श्रावण हर्डीकर, पीएमपीचे अध्यक्ष राजेंद्र जगताप यांचा समावेश असलेल्या संचालक मंडळाने हे प्रस्ताव कोणतेही ठोस कारण न देता पुढे ढकलले. शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यासाठीचा रोजचा पास सध्या 70 रुपयांना आहे. त्याची किंमत करून शहरानुसार त्याचे दर निश्‍चित करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न होता. स्वयंसेवी आणि प्रवासी संघटनांनीही त्याचे स्वागत केले होते. पीएमपीच्या ताफ्यात सुमारे 2500 बस आहेत. त्यात 142 ई-बस आहेत. ई-बसच्या दरात 5 रुपयांची वाढ करण्याचाही प्रस्ताव पुढे ढकलण्यात आला.

चोरट्यांचं धाडस तरी किती; वर्दळीच्या रस्त्यावरून पळवलं मंगळसूत्र!​

बैठकीत मंजूर झालेले महत्त्वाचे निर्णय
- थकबाकीपैकी काही रक्कम दोन्ही महापालिका या आठवड्यात पीएमपीला देणार
- बस थांब्यांचे नामकरण करण्यासाठी लिलाव पद्धतीचा अवलंब होणार
- आगारांच्या आवारात खासगी ई-वाहनांच्या चार्जिंग स्टेशनसाठी भाडेतत्त्वावर जागा देणार

पदाधिकारी म्हणतात....
- महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, "पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील 40 रुपयांच्या दैनंदिन पासबाबत दोन्ही महापालिकेचे पदाधिकारी सकारात्मक आहेत. पुढील बैठकीत या बाबत निर्णय घेऊ. ई-बसच्या भाडेवाढीबाबतही पुरेशी माहिती घेऊन निर्णय करू.''
- स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले, "दैनंदिन पासबाबतचा निर्णय फेटाळलेला नाही, तर पुढच्या बैठकीत त्या बाबत निर्णय होईल. सध्या बस कमी आहेत म्हणून दरवाढीचा निर्णय घेतला नाही. प्रवासी संख्या वाढली पाहिजे, असे आमचेही मत आहे. त्यासाठी नक्कीच पीएमपीला मदत करू.''

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMP board postponed proposal of one day PMT bus pass without giving any reason