चोरट्यांचं धाडस तरी किती; वर्दळीच्या रस्त्यावरून पळवलं मंगळसूत्र!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 October 2020

बारामतीत उपविभागीय पोलिस अधिकारी आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक यांची पथके कार्यरत होती, त्या वेळेस अशा घटनांचा तपास वेगाने होत असे. मात्र मध्यंतरी काही काळापूर्वी ही पथके बरखास्त करण्यात आली.

बारामती : येथील भर वर्दळीच्या कॅनॉल रस्त्यावर महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेले. बुधवारी (ता.30) संध्याकाळी सात वाजता पूर्वा कॉर्नरनजीक ही घटना घडली. सारिका विक्रांत जगदाळे (रा. मोरोपंत शाळेजवळ, मार्केट यार्ड, बारामती) यांनी या संदर्भात शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. 

अवैध दारू विक्रेत्यांनो आता खैर नाही; पुणे जिल्ह्यात कारवाई सुरू​

संध्याकाळी सातच्या सुमारास रस्त्यावरुन पायी निघालेल्या सारिका यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी आणि मंगळसूत्र असे 75 हजारांचे दागिने लाल रंगाच्या दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी हिसकावून नेले. अगदी वर्दळीच्या रस्त्यावर हा प्रकार घडल्याने सारिका यांना काहीक्षण काही सुचलेच नाही. मात्र, काही कळायच्या आत चोरट्यांनी दागिने हिसकावले. हा रस्ता वर्दळीचा असतो आणि सात वाजता या रस्त्यावर बऱ्यापैकी वर्दळ असते. तरीही कोणतीही भीती न बाळगता तिघांनी अगदी आरामात ही चोरी केल्याने महिला वर्गात भीतीचे वातावरण आहे.

राज्यात पोलिस उपायुक्तांच्या बदल्या; पुण्यात नवे अधिकारी​

पथकांची निर्मिती गरजेची....
बारामतीत उपविभागीय पोलिस अधिकारी आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक यांची पथके कार्यरत होती, त्या वेळेस अशा घटनांचा तपास वेगाने होत असे. मात्र मध्यंतरी काही काळापूर्वी ही पथके बरखास्त करण्यात आली. या पथकांच्या जागी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकांची निर्मिती करण्याबाबत अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी सूतोवाच केले होते. प्रत्यक्षात अजूनही या बाबत काहीही कार्यवाही झालेली नाही. मंगळसूत्र, इतर चोऱ्या, मोटारसायकल चोऱ्यांसह इतरही घटनांमध्ये पथकांची कामगिरी लक्षणीय होती. अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर गोपनीय माहिती मिळवून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी बारामतीत पथकांची आवश्यकता आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thieves snatched the mangalsutra from the woman at Baramati