पीएमपी बस स्वारगेटलाच होते फुल्ल; विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे प्रचंड हाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Swargate Depo

‘मी अप्पर डेपो येथून १५ मिनिटांत स्वारगेटला आलो. मात्र, ३० मिनिटांपासून अप्पा बळवंत चौकामध्ये शाळेत जाण्यासाठी बसची वाट पाहत आहे.

पीएमपी बस स्वारगेटलाच होते फुल्ल; विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे प्रचंड हाल

- प्रसाद कानडे

पुणे - ‘मी अप्पर डेपो येथून १५ मिनिटांत स्वारगेटला आलो. मात्र, ३० मिनिटांपासून अप्पा बळवंत चौकामध्ये शाळेत जाण्यासाठी बसची वाट पाहत आहे. बस येते, मात्र प्रवाशाची गर्दी एवढी की मला बसमध्ये चढताच येत नाही. आता पाच मिनिटे वाट पाहील, नाहीतर चालत जाण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही, ’ असे नववीत शिकणारा प्रणव परभणे सांगत होता.

‘मी कात्रजहून आले. शिमला ऑफिसजवळ माझे कार्यालय आहे. ‘पुण्यदशम्‌’च्या बसमध्ये पाय ठेवायला जागा नाही. माझ्यासमोरून १० बस गेल्या. मात्र एकाही बसमध्ये चढू शकले नाही. कार्यालयात जाण्यास खूप उशीर झाला. पीएमपीच्या गलथान कारभाराचा फटका सामान्य प्रवाशांना बसत असून पीएमपीने बाजीराव रस्त्यावर केवळ पुण्यदशम्‌ सोडण्याचा निर्णय तत्काळ मागे घ्यावा,’ अशी मागणी मनीषा जाधव यांनी केली.

‘पीएमपी’ने बाजीराव रस्ता व शिवाजी रस्त्यावर दर दोन मिनिटांनी पुण्यदशम्‌च्या बस सोडण्याचा निर्णय घेतला. शनिवारी बस तीन ते चार मिनिटांनी येत होत्या. मात्र, वाट पाहणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त होती. त्यामुळे एका मिनिटात बस भरून जात होती. कात्रज, अप्पर डेपो, धनकवडी, जांभूळवाडी, नऱ्हेगाव, येवलेवाडी, गुजर-निंबाळकरवाडी, मार्केट यार्ड, आंबेगाव पठार आदी भागांतल्या प्रवाशांना कामानिमित्त मंडई, अप्पा बळवंत चौक या भागात जायचे असते. या प्रवाशांना पीएमपीच्या निर्णयाचा थेट फटका बसत आहे. त्यांना स्वारगेटच्या थांब्यावर बस बदलून शिवाजी रस्ता व बाजीराव रस्ता येथे जावे लागत आहे. मात्र, बसमध्ये प्रवेश करण्यासाठीच त्यांना कसरत करावी लागत आहे. ४० ते ५० मिनिटे थांबूनही त्यांना ‘पुण्यदशम’मध्ये प्रवेश करणे जमत नाही.

सारसबागहून विद्यार्थी पायीच शाळेत

बाजीराव रस्त्यावर सुमारे १५ शाळा आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. आधी हे विद्यार्थी थेट शाळेजवळ बसने पोहचत. आता त्यांना स्वारगेट अथवा सारसबाग येथे उतरावे लागत आहे. मात्र, बाजीराव रस्त्यावरून जाणाऱ्या बसमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी असल्याने विद्यार्थ्यांना बसमध्ये प्रवेशच मिळत नाही. परिणामी, काही विद्यार्थी सारसबाग येथून पायीच शाळेत जात असल्याचे शनिवारी चित्र पाहायला मिळाले.

पीएमपी कर्मचाऱ्यांशी वाद

प्रवाशांना पुण्यदशममध्ये अनेकदा जागाच मिळत नाही. काही चालक आपली ट्रीप पूर्ण केल्यावर चहासाठी थांबतात. मात्र, त्या बसमध्ये प्रवासी बसतात. त्यामुळे वाहकांना आपला ब्रेक पूर्ण होण्याआधीच बस सुरु करावी लागते. तर दुसरीकडे बसमध्ये जागा मिळत नसल्याने प्रवासी पीएमपी कर्मचाऱ्यांशी वाद घालतात.

स्वारगेटला बस फुल्ल, पुढच्या थांब्यांचे का?

स्वारगेटच्या दोन नंबरच्या बस थांब्यावरच पुण्यदशम फुल्ल होत आहे. प्रवाशांना बसण्यास तर सोडा, उभे राहण्यासही जागा मिळत नाही. शिवाजी रस्ता व बाजीराव रस्त्यावर जवळपास आठ ठिकाणी थांबे आहेत. यापैकी एकाही बस थांब्यावर बस थांबून प्रवासी घेता येत नाही. कारण, स्वारगेटहून निघतानाच बस प्रचंड भरलेली आहे. यात स्वारगेट बस स्थानकासमोरील बीआरटीच्या पाच क्रमांकाच्या थांब्यासह सारसबाग, भिकारदास मारुती, शनिपार चौक, अप्पा बळवंत चौक, दक्षिण मुखी मारुती मंदिर, मनपा व शिवाजी नगर आदी थांब्यावर प्रवाशांनी केवळ प्रवाशांनी भरून आलेल्या बस पाहाव्या लागतात.

पुण्यदशम्‌ची संख्या व फेऱ्या वाढविल्या जाणार आहेत. सुमारे ७० फेऱ्या वाढविण्याचा निर्णय झाला. त्यामुळे प्रवाशांना अवघ्या दोन मिनिटांत बस उपलब्ध होईल.

- डॉ. लक्ष्मीनारायण मिश्रा, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे

‘पीएमपी’चे नियोजन फसले

बाजीराव रस्ता व शिवाजी रस्त्यावर १२ मीटर लांबीच्या बसच्या रोज सुमारे ५३६ फेऱ्या होत असत. आता २० बसच्या माध्यमातून पुण्यदशम्‌च्या ६०० फेऱ्या होत आहेत. बसच्या फेऱ्या वाढल्या, मात्र दुपटीने प्रवासी वहनक्षमता घटली आहे. १२ मीटरच्या बसमध्ये ३२ सीटिंग व ३० उभे राहून प्रवासी प्रवास करीत. म्हणजे एका बसमध्ये सरासरी ६० ते ६५ प्रवासी प्रवास करीत असत. पुण्यदशम्‌ची प्रवासी क्षमता कमी आहे. २४ बसून तर ६ जण उभे राहून प्रवास करू शकतात. म्हणजे एकावेळी अवघे ३० प्रवासीच प्रवास करू शकतात. त्यामुळे किमान एक फेरीमागे किमान ३० प्रवाशांना वाट पाहावी लागते. १२ मीटरच्या बसच्या तुलनेने प्रवाशांची वाहतूक करायची असल्यास पीएमपीने पुण्यदशम्‌च्या १०७२ फेऱ्या सुरू करणे गरजेचे आहे. मात्र, पीएमपीने केवळ ६०० फेऱ्या सुरू केल्या. त्यावरून ‘पीएमपी’चे नियोजन चुकले, हे लक्षात येते.

तुमचे अनुभव कळवा...

स्वारगेटवरून ‘पुण्यदशम्‌’च्या बसमध्ये पाय ठेवायला जागा नाही. असाच अनुभव तुम्हालाही येतोय का? यावर काय उपाययोजना कराव्यात, याबाबत आपल्या प्रतिक्रिया नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.

Web Title: Pmp Bus Full In Swargate Depo Student With Passengers In Problems

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..