विद्यार्थ्यांकडून पासची बनवेगिरी

PMP Bus
PMP Bus

पिंपरी - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) सवलतीच्या पासवर विद्यार्थीच खाडाखोड करून बनवेगिरी करीत असल्याचे दक्ष वाहकांमुळे उघडकीस आले. गेल्या आठ दिवसांत असे तीन प्रकार आढळले. त्यातील सर्व विद्यार्थिनी असून, दोघी महाविद्यालयीन, तर एक सहावीतील आहे. यामुळे पीएमपी प्रशासन खडबडून जागे झाले असून, सर्व विद्यार्थ्यांचे पास व ओळखपत्रांची कसून तपासणी करण्याचे आदेश वाहकांना दिले आहेत. 

पीएमपीकडून विद्यार्थी व नियमित प्रवाशांसह ज्येष्ठ नागरिक, अपंग, दिव्यांगांना सवलतीचे पास मिळतात. मात्र, काही विद्यार्थी खाडाखोड करून जुनेच पास पुन्हा वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे. दोन दिवसांपूर्वी भोसरी-चिंचवड मार्गावरील बसमध्ये औषधनिर्माणशास्त्राचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीकडे तब्बल १२ पास आढळले. ते जप्त केले असून, तिच्याकडून वापरलेल्या पासची रक्कम दरमहा ७५० प्रमाणे १२ महिन्यांचे नऊ हजार व त्या कालावधीतील दंडाची रक्कम दरमहा ५०० याप्रमाणे सहा हजार असे १५ हजार रुपये बुधवारी (ता. १७) वसूल केले. 

वाहकाची दक्षता
वाहक अंगद जाधव यांनी विद्यार्थिनीकडील पास तपासला. त्यावरील तारखेत बदल केलेला आढळला. पास ठेवलेल्या प्लॅस्टिक पाकिटात त्यांना ११ पास आढळले. त्यातील पाच पुढील महिन्यांचे म्हणजे डिसेंबर २०१९ पर्यंतचे होते. चौकशीनंतर विद्यार्थिनीची बनवेगिरी उघडकीस आली. तिच्या मैत्रिणीसमक्ष आगार व्यवस्थापक विजय रांजणे, तिकीट तपासणीस बबन काकडे, मारुती गाढवे व स्वारगेट पास वितरण विभागातील लिपिक निजामुद्दीन इनामदार यांच्या पथकाने पंचनामा करून पास व दंडाची रक्कम वसूल केली.

अशी मिळते सवलत
पहिलीपासून पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पीएमपी सवलतीच्या दरात पासचे वितरण करते. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना शंभर टक्के, महापालिका क्षेत्रांतील खासगी शाळांच्या विद्यार्थ्यांना ७५ टक्के सलवत मिळते. नोकरदार किंवा नियमित प्रवाशांना तीस दिवसांचा पास १४०० रुपयांत मिळतो. उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ७५० रुपयांत पास दिला जातो. नियमित प्रवाशांपेक्षा त्यांना सरासरी ५३ टक्के सवलत मिळते. गेल्या वर्षी असे चार लाख ३७ हजार पास पीएमपीने वितरित केले होते. सवलतीपोटीची रक्कम दोन्ही महापालिकांकडून पीएमपीला मिळते.

पालकांनीही मुलांबाबत दक्ष असायला हवे. त्यांनी दर महिन्याला नवीन पास घेतला आहे का? त्यांच्याकडून पासचा गैरवापर होत नाही ना? याबाबत विचारपूस करायला हवी. तसेच, सर्व प्रकारचे पास बारकाईने तपासण्याची सूचना सर्व वाहकांना दिली आहे. 
- विजय रांजणे, आगार व्यवस्थापक, नेहरूनगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com