‘पीएमपी’ मोजतेय अखेरची घटका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरविणारी पीएमपी शेवटची घटका मोजत असून, शहरातील राजकीय नेतृत्वाकडून होत असलेली हेळसांड ‘परिसर’ या स्वयंसेवी संस्थेच्या अहवालातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरविणारी पीएमपी शेवटची घटका मोजत असून, शहरातील राजकीय नेतृत्वाकडून होत असलेली हेळसांड ‘परिसर’ या स्वयंसेवी संस्थेच्या अहवालातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. पीएमपीमध्ये तातडीने सुधारणा न झाल्यास दोन्ही शहरांतील लाखो प्रवाशांची प्रचंड गैरसोय होणार असल्याचा निष्कर्ष ‘परिसर’ने तीन वर्षांच्या अहवालांच्या अभ्यासाअंती काढला आहे. या कालावधीत सर्वच पातळीवर पीएमपीची घसरण होत असल्याचेही वास्तव पुढे आले आहे.

जानेवारी २०१६ ते डिसेंबर २०१८ दरम्यान पीएमपीकडून दरमहा प्रसिद्ध होत असलेल्या अहवालांचा अभ्यास करून ‘परिसर’ने पीएमपीबद्दल निष्कर्ष काढला आहे. त्याचे सादरीकरणही पीएमपीच्या अध्यक्षांना केले असून, सुधारणा करण्यासाठी आग्रह धरला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सुमारे ११ ते १२ लाख प्रवासी पीएमपीवर अवलंबून आहेत. विद्यार्थी, कष्टकरी, नोकरदार, लहान व्यावसायिक आणि ज्येष्ठ नागरिकांचा प्रामुख्याने त्यात समावेश आहे. २०१६, २०१७ आणि २०१८ या वर्षांपैकी सरते वर्ष पीएमपीसाठी आव्हानात्मक गेले आहे. पीएमपीमधील कार्यक्षमता कमी होत असल्यामुळे बस संख्या कमी झाली आहे, असेही त्यात आढळून आले आहे. 

पीएमपीची दैनंदिन प्रवासी संख्या कमी झाली असून, दररोज मार्गांवर धावणाऱ्या बसची संख्याही कमी झाली आहे. एक लाख लोकसंख्येमागे ५५ बस असाव्यात, असे शहराच्या सर्वंकष वाहतूक आराखड्यात (क्रॉम्प्रेन्सिव्ह मोबिलीटी प्लॅन) म्हटले आहे. प्रत्यक्षात त्यापेक्षा सुमारे निम्म्याच बस मार्गांवर आहेत. तर, अपघातांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे प्रवासी संख्या घटत असून, पीएमपीच्या उत्पन्नावरही परिणाम होत आहे. परिणामी, नवे प्रवासी आकृष्ट करताना पीएमपीला मर्यादा येत आहेत, असेही या अभ्यासातून निष्पन्न झाले आहे.

 सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बसचे आयुर्मान सरासरी पाच ते सात वर्षे असते. परंतु, पीएमपीमधील बसचे आयुर्मान ९.६ वर्षांचे झाले आहे. आयुर्मान संपलेल्या सुमारे ४०० बस ताफ्यात आहेत. त्यामुळे त्यांची दुरुस्ती करून त्या मार्गावर आणणे आव्हान ठरत आहे. सुट्या भागांचीही अडचण आहे.  बससंख्या वाढवण्यासाठी प्रशासन पाठपुरावा करीत आहे. परिस्थिती नक्कीच बदलेल, फक्त त्यासाठी थोडासा वेळ लागेल. 
- नयना गुंडे, अध्यक्षा, पीएमपी

 दोन्ही शहरांसाठी पीएमपी ही अत्यावश्‍यक आहे. त्याशिवाय सार्वजनिक वाहतुकीचा कोणताही पर्याय सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे पीएमपीने विकासाची नेमकी उद्दिष्टे निश्‍चित करून त्यानुसार वाटचाल केली पाहिजे. देखभाल-दुरुस्तीवर अधिक लक्ष दिले, तर मार्गावरील बसची संख्या वाढेल. अशा पद्धतीने सक्षमतेचा निश्‍चित कार्यक्रम तयार करून त्यानुसार वाटचाल केली पाहिजे. 
- रणजित गाडगीळ , ‘परिसर’

Web Title: PMP Bus Issue