

Officials presented the transport utility's financial status, while disagreements over a promotion-related issue led to a walkout by opposition corporators.
sakal
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) कारभारावर आयोजित महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभा तब्बल साडेदहा तास सुरू होती. पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांच्याकडून सविस्तर खुलासा झाला. पण तो समाधानकारक नसल्याने आणखी चर्चा सुरू झाली. त्याच वेळी पदोन्नतीमध्ये झालेल्या घोटाळ्याच्या अहवालावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. विरोधीपक्षनेते निलेश निकम यांच्याबद्दल सभागृहनेते गणेश बिडकर यांनी केलेल्या टिपणीमुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सभात्याग केला अन् याच गोंधळात पीएमपीला पैसे देण्याचा विषय भाजपने मंजूर करून घेऊन कामकाज संपविले. या शेवटच्या काही मिनिटांमध्ये झालेल्या गोंधळामुळे एवढी चर्चा करूनही नगरसेवकांचे प्रश्न मात्र अनुत्तरित राहिले. दरम्यान, काँग्रेसचे नगरसेवक सुनील शिंदे यांनी भाजप व राष्ट्रवादीने मुद्दाम वाद निर्माण करून सभा तहकूब केली. त्यामुळे पुणेकरांच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत, अशी टीका केली.