पीएमपीला बूस्टर

E-Bus
E-Bus

ऑक्‍टोबरमध्ये येणार ३०० नवीन बस
पुणे - पीएमपीच्या ताफ्यात पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत सीएनजीवर धावणाऱ्या २२५ बस आणि ७५ ई-बस दाखल होणार आहेत. मात्र, या बस येण्यास उशीर झाल्यामुळे उत्पादक कंपन्यांकडून प्रतिबस रोज दहा हजार रुपये दंड आकारण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावाला संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे उत्पादक कंपन्यांना एकूण साडेचार कोटी रुपये दंड होणार आहे.

पीएमपीने १५० ई-बस भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. त्यातील ७५ बस दाखल झाल्या आहेत, तर उर्वरित ७५ बस यायच्या आहेत. तसेच, सीएनजीवर धावणाऱ्या ४०० पैकी १७५ दाखल झाल्या असून, उर्वरित २२५ बसची प्रतीक्षा आहे. 

संचालक मंडळाच्या शनिवारी (ता. ७) झालेल्या बैठकीत या बस ऑक्‍टोबरअखेरीस ताफ्यात दाखल करण्यासाठीची आवश्‍यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचा आदेश महापौर मुक्ता टिळक आणि संचालक सिद्धार्थ शिरोळे यांनी दिला. पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या ३०० बस प्रत्येकी १२ मीटर लांबीच्या आहेत. शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील बीआरटी मार्गावर त्या धावू शकतील. उत्पादक कंपन्यांकडून त्या आल्यावर त्यांची नोंदणी तातडीने करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी (आरटीओ) चर्चा करण्याचेही बैठकीत ठरले.

प्रवासी म्हणतात...
विपुल पाटील (प्रवासी) 

पीएमपीच्या दैनंदिन आणि मासिक पासची किंमत कमी करण्यासाठी १० हजार नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन पीएमपीच्या संचालक मंडळाला दिले आहे. त्याबाबत कार्यवाही का होत नाही? पासचे दर कमी झाले तर प्रवासी वाढू शकतात, हे लक्षात घ्यायला पाहिजे.

दत्तात्रेय फडतरे (प्रवासी) 
पीएमपीमध्ये नव्या बस येत आहेत, ही बाब चांगली आहे. परंतु, मिडीबसमधील सध्याची आसनव्यवस्था सदोष आहे. लांब अंतराच्या प्रवाशांना सध्याच्या आसनव्यवस्थेचा त्रास होत आहे, त्याची प्रशासनाने दखल घ्यावी.

प्रत्येक बसमध्ये अग्निशमन उपकरणे
पीएमपीच्या बसला आग लागण्याच्या काही घटना नुकत्याच घडल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक बसमध्ये अग्निशमन उपकरणे बसविण्याच्या सूचना उत्पादक कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार या बसमध्ये आधुनिक उपकरणे बसविण्यात येत असल्याचे पीएमपीचे मुख्य अभियंता सुनील बुरसे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com