पीएमपीच्या तुटीचे खापर मेट्रोवर

पीएमपीच्या तुटीचे खापर मेट्रोवर

पुणे - पीएमपीच्या संचलनातील तूट भरून काढण्यासाठी दरवर्षी महापालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. पण, प्रशासनाकडून सुधारणा केल्या जात नाहीत, अशी टीका नगरसेवकांनी पीएमपीवर केली. मात्र, पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांनी तूट वाढण्याचे खापर मेट्रोवर फोडले आहे. मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे पीएमपी बसच्या अनेक फेऱ्या रद्द झाल्या आहेत. पर्यायाने तूट वाढत आहे, असे त्यांनी सर्वसाधारण सभेत सांगितले.

प्रवाशांची संख्या घटली
पीएमपीचे वर्षभरात प्रवासी कमी झाले आहेत. त्यामुळे ३९ कोटींनी उत्पन्न घटले आहे. तसेच जाहिरात, इमारत भाडे, पुणे दर्शन बससेवेचेही उत्पन्न घटले आणि इंधनाचा खर्च वाढल्याने वर्षात २०१८-१९ मध्ये पीएमपीच्या संचलनातील तूट २४४ कोटींवर गेली आहे. २०१७-१८ मध्ये ही तूट २०४ कोटी होती, असे गुंडे यांनी सांगितले.

पीएमपीला एप्रिल ते जुलै दरम्याच्या संचलनातील तुटीपोटी ४८ कोटींच्या खर्चास मान्यता दिली. या वेळी नगरसेवकांनी पीएमपी प्रशासनाच्या कारभारावर टीका केली. तसेच तोटा कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या, असा प्रश्‍न विचारला.

गुंडे म्हणाल्या, ‘‘पीएमपीच्या ताफ्यातील अनेक बस जुन्या आहेत. तसेच वर्षभर ठेकेदाराच्या ५६ बस रस्त्यावर उतरलेल्या नाहीत. बसच्या फेऱ्या ८५ हजार किलोमीटरने कमी झाल्या आहेत. त्यामुळे उत्पन्न बुडाले आहे. स्वारगेट ते निगडी आणि कोथरूड ते रामवाडी या मार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे. वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे बसच्या अनेक फेऱ्या रद्द झाल्या आहेत. बस पार्किंगसाठी जागा नाही. त्यामुळे त्या दूरवर उभ्या कराव्या लागतात. सीएनजी गॅस भरण्यासाठी बसना लांब जावे लागते. त्यामुळे डेड किलोमीटर वाढत आहे. अशा कारणांमुळे संचलनातील तूट वाढत आहे.’’ 

पाच वर्षांतील पीएमपीची वाढलेली तूट 
२०१४-१५    १६७ कोटी
२०१५-१६    १५७ कोटी
२०१६-१७    २१० कोटी
२०१७-१८    २०४ कोटी
२०१८-१९    २४४ कोटी

पीएमपीत येणार १६४० बस
पुणे महानगर परिवहन मंडळातील (पीएमपी) अनेक बस जुन्या झाल्याने त्या बंद पडण्याचे प्रमाण वाढत आहे. पीएमपीचा तोटा कमी करण्यासाठी व प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी नवीन बस खरेदी केली जाणार आहे. २०२०-२१ पर्यंत नवीन १ हजार ६४० बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होतील, असे पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी सांगितले. 

 सर्वसाधारण सभेमध्ये गुंडे यांनी बस खरेदीचा कालबद्ध कार्यक्रम नगरसवेकांना सांगितला. केंद्र शासनाच्या नॅशनल इलेक्‍ट्रिक मोटारव्हेईकल मिशननुसार २०३० पर्यंत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील सर्व बसेस इलेक्‍ट्रिक असणार आहेत. त्यादृष्टीने पीएमपी पुढील वर्षभरात ५०० इलेक्‍ट्रिक बस घेणार आहे. त्यातील २५ बस सध्या धावत आहेत. १२५ बसची ऑर्डर दिली असून, त्यातील ७० बस जुलै, तर ५५ बस ऑगस्टमध्ये येतील. ४०० सीएनजी बसपैकी जून-ऑगस्टमध्ये प्रत्येकी ५०, तर सप्टेंबर, ऑक्‍टोबर आणि नोव्हेंबरमध्ये प्रत्येकी १०० बस घेण्यात येणार आहेत. ४४० सीएनजी बस भाड्याने घेण्यासाठी प्रक्रिया सुरू असून, चार निविदा आल्या आहेत. हे काम अंतिम टप्प्यात आहे. केंद्र शासनाकडून इलेक्‍ट्रिक बससाठी ५५ लाख रुपये अनुदान मिळत आहे, ३५० बस घेण्यासाठी केंद्राकडे या महिन्याअखेर प्रस्ताव पाठवला जाईल. इतर ३५० बस घेण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे, त्या पुढच्या डिसेंबरमध्ये येतील. अशा प्रकारे नवीन बस खरेदीचे नियोजन केले आहे. या सर्व बस २०२०-२१ पर्यंत रस्त्यावर धावतील. त्यामुळे पीएमपीचे ९० टक्के प्रश्‍न सुटतील. प्रवाशांना चांगली सुविधा मिळेल, असे गुंडे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com