
पुणे - नव्या वर्षात पीएमपीने पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना ३५० ई- बसची भेट दिली असून, येत्या सहा महिन्यांत त्या दाखल होतील. त्यानंतर पीएमपी ही देशातील सर्वाधिक ६५० ई - बस असलेली परिवहन संस्था ठरणार आहे.
पीएमपीच्या ताफ्यात सध्या १५० ई- बस आहेत. केंद्र सरकारच्या ‘ फेम २ ़’ योजनेतंर्गत १५० बसही येत्या डिसेंबरपर्यंत पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. नव्या ३५० ई- बस भाडेत्त्त्वावर १२ वर्षांसाठी पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यासाठी प्रती किलोमीटर पीएमपीला ६७ रुपये ४० पैसे भाडे द्यावे लागणार आहे. केंद्र सरकारच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्स्पोर्टच्या (सीआयआरटी) निकषांनुसार एक लाख लोकसंख्येमागे ५० बसची आवश्यकता आहे. त्यानुसार पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील एकूण ७० लाख लोकसंख्या विचारात घेता, पीएमपीच्या ताफ्यात ३५०० बसची आवश्यकता आहे. मात्र, पीएमपीकडे सध्या २४३१ बस आहेत. त्यातील सुमारे ४०० बस कालमर्यादेनुसार येत्या वर्षात ताफ्यातून काढून टाकल्या जाणार आहेत. त्यामुळे नव्या बस भाडेतत्त्वावर घेण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने पीएमपीला मंजुरी दिली होती. तसेच दोन्ही महापालिकांच्या माध्यमातून प्रतिबस ५० लाख रुपये अनुदानही देण्यात येणार आहे. नव्या बस दोन्ही शहरांत तसेच जिल्ह्यातील प्रवाशांच्या सेवेतही उपलब्ध होणार आहेत.
पेट्रोल, डिझेलमुळे होणारे प्रदूषण लक्षात घेता ई- बसला प्राधान्य देण्याचे धोरण केंद्र सरकारने अवलंबिले आहे. त्यानुसार ३५० ई - बस भाडेतत्त्वावर घेण्यासाठी पीएमपीने निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यात तीन कंपन्या सहभागी झाल्या होत्या. त्यांच्यातील दरांचा आढावा ‘सीआयआरटी’द्वारे घेण्यात आला. त्यानुसार ओलेक्टा कंपनीची निविदा पात्र ठरल्यामुळे त्यांना २८ जानेवारी रोजी कार्यआदेश (वर्कऑर्डर) देण्यात आली, अशी माहिती पीएमपीचे अध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी दिली.
पीएमपीला आता पीएमआरडीएच्या क्षेत्रातही वाहतूकसेवा पुरविण्यास संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. त्यामुळे पीएमपीला जादा बसची आवश्यकता लागणार आहे. तसेच नव्या ई- बस ताफ्यात येणार असल्यामुळे त्यांचे चार्जिंग स्टेशन्सही उभारण्याची प्रक्रिया पीएमपीने सुरू केली आहे.
- डॉ. राजेंद्र जगताप, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएल
नव्या ई-बसबद्दल
भाडेतत्त्वावरील ३५०
ई-बस ऑगस्टअखेर येणार
केंद्र सरकारच्या १५० ई-बस डिसेंबरअखेर येणार
बसची लांबी १२ मीटर, आसन क्षमता ३३
प्रतीकिलोमीटर खर्च
डिझेल २६ रूपये ५१ पैसे
सीएनजी १८ रुपये १० पैसे
ई - बस ९ रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.