esakal | PMPML : पासच्या दरातील कपातीचा फायदा प्रवाशांना मिळणार १८ दिवसांनी
sakal

बोलून बातमी शोधा

PMPML : पासच्या दरातील कपातीचा फायदा प्रवाशांना मिळणार १८ दिवसांनी

PMPML : पासच्या दरातील कपातीचा फायदा प्रवाशांना मिळणार १८ दिवसांनी

sakal_logo
By
मंगेश कोळपकर (mangesh.kolapkar@esakal.com)

पुणे : प्रवाशांना आवश्यक असलेल्या दैनंदिन पासच्या रकमेत कपात करण्याचा निर्णय पीएमपीच्या संचालक मंडळाने घेतला खरा.... परंतु, त्याची अंमलबजावणी होण्यासाठी पुणेकरांना १८ दिवसांचा कालवधी लागणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा फायदा प्रवाशांना गणेशोत्सवानंतर मिळण्याची शक्यता आहे.

पीएमपीच्या दैनंदिन आणि मासिक पासेसच्या दरात कपात करण्याचा निर्णय पीएमपीच्या संचालक मंडळाने २ सप्टेंबर रोजी घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी ७ सप्टेंबरपासून होणार असल्याची घोषणाही महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली. परंतू, महापालिका आणि पीएमपीमधील तांत्रिक प्रक्रिया लांबणीवर पडत असल्यामुळे संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयापासून प्रवासी वंचित राहत आहेत. दोन्ही महापालिकेचे पदाधिकारी, आयुक्त या बैठकीत असूनही पास दरात कपात करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.

हेही वाचा: राष्ट्रीय महिला आयोगाची राज्य सरकारसह मुंबई पोलिसांवर सडकून टीका

पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे म्हणाले, ‘‘संचालक मंडळाच्या बैठकीचा इतिवृत्तांत तीन दिवसांपूर्वी मिळाला. त्यानुसार ९०० आणि १२०० रुपयांच्या पासची छपाई करावी लागेल. त्यासाठी महापालिकेच्या प्रिंटिग प्रेसला ऑर्डर दिल्यावर ते ८ दिवसांनंतर छापून मिळतात. सलग सुट्ट्यांमुळे हे पास गणेशोत्सवानंतर छापून मिळतील, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर ते प्रवाशांसाठी उपलब्ध केले जातील.’’ पीएमपीला सुमारे २ लाख पास छापून घ्यायचे आहेत. ते वेळेत मिळणे, त्यानुसार पुढील प्रक्रियेची अंमलबजावणी करणे, यासाठी थोडा वेळ लागू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

पीएमपीचा दैनंदिन प्रवासाचा पास पूर्वी ७० रुपयांना होता. मात्र, संचालक मंडळाने त्याची फोड केली आहे. त्यानुसार आता महापालिका हद्दीत फिरण्यासाठी ४० रुपये, दोन्ही महापालिका हद्दीत फिरण्यासाठी ५० रुपये आणि दोन्ही महापालिका हद्दीबाहेर फिरण्यासाठी ७० रुपये पासचे शुल्क निश्चित करण्यात आले आहे. प्रवाशांमध्ये हे पास लोकप्रिय आहेत. मात्र, ते अद्याप उपलब्ध झालेले नाहीत.

हेही वाचा: सहकार मंत्र्यांच्या पुतणीचा काँग्रेस आमदार पीएन पाटील यांच्यासह मुलाकडून छळ

असे असतील नवे दर :

दैनिक सामान्य पास

एका मनपा हद्दीत : ₹ ४०

दोन्ही मनपा हद्दीत : ₹ ५०

मनपा हद्दीबाहेरसह : ₹ ७०

मासिक पास- सामान्य

एका मनपाहद्दीत : ₹ ९००

दोन्ही मनपा हद्दीत : ₹ १२००

मनपा हद्दीबाहेरसह : ₹१४००

loading image
go to top