वाघोलीतील टीपी स्किमचे प्रारूप जाहीर 

वाघोलीतील टीपी स्किमचे प्रारूप जाहीर 

पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सातारा व नगर महामार्गाला जोडणाऱ्या रिंगरोडचे काम पहिल्या टप्प्यात हाती घेतले आहे. पहिल्या टप्प्यातील रिंगरोडसाठीची जागा ताब्यात घेण्यासाठी या मार्गावर चौदा नगर रचना योजना (टीपी स्कीम) राबविण्यात येत आहे. त्यानुसार वाघोली येथील टीपी स्कीमचे प्रारूप पीएमआरडीएने जाहीर केले आहे. ही योजना मार्गी लागल्यानंतर वाघोलीतील वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होणार आहे. 

रस्ते व सार्वजनिक सोयी-सुविधा व सुनियोजित विकास करण्यासाठी पीएमआरडीएला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून घोषित करण्यात आले आहे. पीएमआरडीए हद्दीचा सुनियोजित व जलद विकास होण्यासाठी नगर रचना योजना टीपी स्कीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार वाघोली येथील टीपी स्कीम क्रमांक 14 चे प्रारूप प्रसिद्ध करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात आंबेगाव खुर्द ते वाघोली यांना जोडणारा सुमारे 33 किलो मीटर लांबीचा आणि 110 मीटर रुंदीचा रिंगरोड होणार आहे. 

यासंदर्भात प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते म्हणाले, ""रांजणगाव औद्योगिक वसाहत विकसित झाल्याने टीपी स्कीममुळे वाघोलीच्या विकासात भर पडणार आहे. या योजनेमुळे झोनमध्ये बदल होऊन कोणतेही अधिमूल्य न भरता विकसनक्षम विभागातील जमीन मालकांना विकसित भूखंड मिळणार आहे; तसेच कोणीही विस्थापित व भूमिहीन न होता रस्ते, शाळा, दवाखाने, बगीचा, क्रीडांगणे व इतर सार्वजनिक सुविधांकरिता जमीन उपलब्ध होणार आहे. जमीनधारकांचे कोणतेही नुकसान न होता समान न्यायाने योग्य आकाराचे जमिनीच्या मोबदल्यात नियमित आकारातील विकसित भूखंड मिळतात. टीपी स्कीम योजनेअंतर्गत नागरिकांना सुनियोजित रस्ते, सांडपाणी व्यवस्था, पाणीपुरवठा, विद्युतीकरण आदी सोयीसुविधा प्राधिकरणाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.'' 

राबविण्यात येणाऱ्या नगर रचना योजना 
म्हाळुंगे, वडाचीवाडी, औताडे-हांडेवाडी, उरुळी देवाची येथे प्रत्येकी एक योजना, होळकरवाडी, फुरसुंगी, वडकी, वाघोली येथे दोन, तर मांजरी खुर्द येथे तीन नगर रचना योजना होणार आहेत. अशा प्रकारे चौदा योजना राबवून त्यामाध्यमातून रिंगरोडसाठीची जागा ताब्यात घेण्यात येणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com