पुणे-सोलापूर रस्त्यावरील पीएमआरडीएची अर्धवट कारवाई

pune
pune

मांजरी : सोलापूर रस्त्यावरील ग्रॅन्ड बे सोसायटीतून शेवाळेवाडीकडे जाणारा रस्ता बांधकाम व्यवसायिकाने अडविला आहे. तो खुला करुन देण्याचा आदेश देवूनही त्याने दुर्लक्ष केल्याने पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणच्या अतिक्रमण विरोधी पथकाने काल (ता.२) सकाळी त्यावर कारवाई केली. मात्र, कारवाई सुरू असताना सोसायटीतील नागरिकांनी केलेल्या विरोधामुळे अतिक्रमण विरोधी पथकाला कारवाई अर्धवट सोडत दुपारी परत फिरावे लागले.

येथील रस्ता बांधकाम व्यवसायिकाने भिंत घालून बंद केला आहे. तो खुला करून द्यावा, यासाठी शेवाळवाडी ग्रामपंचायत गेली अनेक महिन्यांपासून प्रयत्न करीत आहे. त्यांच्या मागणीची दखल व गरज लक्षात घेऊन ही भिंत काढून टाकण्याचा आदेश पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणचे आयुक्त किरण गित्ते यांनी दिला होता. मात्र, संबधीत व्यवसायिकाकडून प्रतिसाद न मिळाल्याने प्राधिकरणाकडून कारवाई करण्यात आली. सकाळी तहसीलदार औदुंबर पाटील, पीएमआरडीएचे सहायक शाखा अभियंता राजेश मांडगे, पोलीस अधिकारी शेरे यांच्या उपस्थितीत ही कारवाई सुरू केली होती. भिंतीचा काही भाग पाडल्यानंतर लगेचच सोसायटीधारक महिला पुरुषांनी कारवाईला विरोध करीत काम बंद पाडले. अधिकारी, कर्मचारी व सोसायटी धारकांमध्ये हुज्जत होऊन तेथे तणाव निर्माण झाला होता. दुपारी तीन वाजेपर्यंत नागरिकांना समजावून सांगण्यात येत होते. शेवटी सोसायटी धारकांनी लेखी निवेदन देऊन पुढील कारवाईसाठी चार दिवसांची मुदत मागून घेतली. त्यांची मागणी मान्य करीत व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता तहसीलदारांनी कारवाई थांबवली. 
दरम्यान, शेवाळवाडी ग्रामपंचायतचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी आयुक्तांच्या आदेशानुसार कारवाई व्हावी, अशी मागणी केली.

"गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून हा रस्ता खुला करण्यासाठी पीएमआरडीएकडे पाठपुरावा करीत आहे. संबंधित बांधकाम व्यावसायिकाला रस्ता खुला करण्याबाबतचे आदेश दिलेले आहेत. मात्र, त्याच्याकडून अद्याप रस्ता खुला केला गेला नाही, त्यामुळे आज पीएमआरडीएचा अतिक्रमण विभाग कारवाई करण्यासाठी आला होता. तहसीलदारांनी सांगितल्यानुसार पुढील चार दिवसांत ही कारवाई पूर्ण झाली पाहिजे.'
- विक्रम शेवाळे, नागरिक, शेवाळेवाडी ग्रामपंचायत

"आयुक्तांच्या आदेशानुसार अतिक्रमण कारवाई कायदेशीर केली जात होती. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तात्पुरती कारवाई थांबविण्यात आली आहे. सोसायटी धारकांना समजावून सांगून व पुरेशा बंदोबस्तात चार दिवसांनी भिंतीचे राहिलेले अतिक्रमण काढून रस्ता खुला करण्यात येईल.'
- औदुंबर पाटील, तहसीलदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com