‘पीएमआरडीए’चा मेट्रो प्रकल्प हा सर्वाधिक निधी मिळवणारा देशातील पहिला प्रकल्प | PMRDA | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PMRDA
‘पीएमआरडीए’चा मेट्रो प्रकल्प हा सर्वाधिक निधी मिळवणारा देशातील पहिला प्रकल्प

‘पीएमआरडीए’चा मेट्रो प्रकल्प हा सर्वाधिक निधी मिळवणारा देशातील पहिला प्रकल्प

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणा (पीएमआरडीए) ने हाती घेतलेला हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प हा केंद्र सरकारकडून सर्वाधिक ‘आर्थिक व्यवहार्यता तफावत निधी’ (व्हीजीएफ) देणारा देशातील पहिला प्रकल्प ठरला आहे. याबरोबरच केंद्र सरकारने मेट्रो प्रकल्पांसाठी तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार होत असलेला हा पहिलाच प्रकल्प आहे. त्यामुळे पुणे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्यात आला आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर या दरम्यान २३ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाचे काम पीएमआरडीएने हाती घेतले. खासगी सहभागातून (पीपीपी) हा प्रकल्प पीएमआरडीएकडून हाती घेण्यात आला. हे काम निविदा मागवून टाटा-सिमेन्स या कंपनीला देण्यात आले. या प्रकल्पासाठी एकूण सुमारे साडेसहा हजार कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. त्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रत्येकी वीस टक्के, तर टाटा कंपनीने साठ टक्के रक्कम देण्याचा प्रस्ताव तयार केला. परंतु या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून ‘व्हायबल गॅप फंडींग’ (व्हीजीएफ)च्या स्वरूपात केंद्र सरकारकडून १२३० कोटी रुपयांचा निधी मिळणे अपेक्षित होते. त्यास केंद्र सरकारकडून मान्यता देण्यात आली. त्यामुळे प्रकल्प मार्गी लागण्याच्या दृष्टीने अडचण दूर झाली आहे.

हेही वाचा: पुणे : पुनर्वसनाच्या कार्यवाहीमुळे शिवाजीनगरमधील वाहतुकीत बदल

देशभरातील अशा मोठ्या प्रकल्पांसाठी ‘व्हीजीएफ’च्या माध्यमातून फंडींग करण्यासंदर्भातील नवीन नियमावली केंद्र सरकारकडून तयार करण्यात आली. डिसेंबर २०२० मध्ये ही नियमावली लागू करण्यात आली. त्यानुसार मान्यता मिळालेला हा देशातील पहिला प्रकल्प आहे. तर २०१७ मध्ये मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र सरकारने नव्याने पॉलीसी तयार केली होती. त्यानुसार उभारलेला हा प्रकल्प आहे. यापूर्वी हैदराबाद, मुंबई आणि कोची या ठिकाणी खासगी सहभागातून मेट्रो प्रकल्प राबविण्यात आले. मात्र त्यावेळी अशा प्रकल्पांना व्हिजीएफच्या माध्यमातून निधी देण्यासाठी ठोस कोणतेही नियम नव्हते. त्यामुळे काही प्रकल्पांना केंद्र सरकारकडून व्हीजीएफच्या रूपात ८ ते १० टक्क्यांपर्यंत निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. एवढेच नव्हे, तर महामेट्रो हाती घेतलेल्या मेट्रो प्रकल्पाला देखील केंद्र सरकारकडून १० टक्केच निधी मिळाला आहे. या उलट पीएमआरडीएच्या मेट्रो प्रकल्प व्हीजीएफच्या स्वरूपात पहिल्यांदाच २० टक्क्यांचा निधी केंद्र सरकारकडून देण्यात आला आहे.

‘पीएमआरडीए’ने हाती घेतलेल्या मेट्रो प्रकल्पासाठी ‘व्हीजीएफ’च्या स्वरूपात वीस टक्के निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. केंद्र सरकारकडून ‘व्हीजीएफ’ फंडिंग आणि मेट्रो प्रकल्पासाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार देशात होत असलेला हा पहिला मेट्रो प्रकल्प आहे. पुणेकरांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.

- विवेक खरवडकर (मुख्य अभियंता, पीएमआरडीए)

loading image
go to top