पीएमआरडीए करणार 18 हजार घरांची निर्मिती 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कार्यक्षेत्रात पंतप्रधान आवास योजनेतंर्गत 18 हजार 211 घरांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यापैकी निम्म्याहून अधिक म्हणजे नऊ हजार 337 घरे म्हाडाच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती पीएमआरडीएचे आयुक्‍त किरण गित्ते यांनी दिली. 

केंद्र सरकारने 2022 पर्यंत नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेची सुरवात केली. पीएमआरडीएच्या क्षेत्रात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. खासगी भागीदारी तत्त्वावर (पीपीपी) मॉडेल अंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यात 27 हजार 147 घरांची निर्मिती केली जाणार आहे. त्यापैकी 18 हजार 211 घरे ही पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात आहेत. त्यातील नऊ हजार 337 घरे लाभार्थ्यांना म्हाडाच्या दरात उपलब्ध करून देण्यात येतील. 

पुणे जिल्ह्यातील वाघोली, शिरूर तालुक्‍यात वढू, हवेली तालुक्‍यात वडगाव, वेळू आणि खेड तालुक्‍यात म्हाळुंगे याठिकाणी घरे बांधण्यात येणार आहेत. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना प्रत्येकी अडीच लाख रुपयांप्रमाणे सुमारे 455 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. तसेच, येत्या दीड वर्षात ही घरे बांधून देण्याचे बंधन विकसकांवर घालण्यात आले असल्याचे गित्ते यांनी सांगितले. 

पंतप्रधान आवास योजनेत नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नागरिकांनी या योजनेत सहभागी व्हावे. योजनेची विस्तृत माहिती औंध येथील पीएमआरडीए कार्यालयात उपलब्ध आहे. 
- किरण गित्ते, आयुक्‍त, पीएमआरडीए 

आर्थिक दुर्बल घटकांसाठी - 350 चौरस फुटांची घरे 
अल्प उत्पन्न गटांसाठी - 650 चौरस फुटांची घरे 

Web Title: PMRDA to produce 18,000 houses