पीएमआरडीए वॉटर फंड आकारणार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात येणार आहेत. वाघोली आणि पिरंगुट परिसरातील पाच गावांसह काही ठिकाणी पाणीपुरवठा प्रकल्प उभारण्यात येणार असून, त्यासाठी पीएमआरडीएकडून वॉटर फंड आकारण्यात येणार असल्याची माहिती आयुक्‍त किरण गित्ते यांनी दिली. 

पीएमआरडीएच्या या फंडातून प्राधिकरणाच्या हद्दीत पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात येणार आहे. परिसरातील बांधकाम प्रकल्पांना परवानगी देताना विकसकांकडून प्रत्येक सदनिकेमागे वीस हजार रुपये इतका निधी आकारण्यात येणार आहे. मात्र, यापूर्वी परवानगी दिलेल्या बांधकाम प्रकल्पांकडून हा निधी घेण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

शहरालगतच्या भागात नागरीकरण झपाट्याने होत आहे. तेथील नागरिकांना ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा करण्यात येतो. पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातील बांधकामांना परवानगी देताना प्रकल्पाला पाणी उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्र ग्रामपंचायतींकडून दिले जाते. ही बाब ग्राह्य धरून पीएमआरडीएकडून मान्यता दिली जाते. परंतु, नागरिकांकडून पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याच्या तक्रारी येतात. या संदर्भात गित्ते म्हणाले, ""पीएमआरडीएने पाणीपुरवठा योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. वाघोली येथे पाणीपुरवठा करण्यासाठी प्रकल्प बांधण्यात येणार आहे. त्यासाठी वढूच्या बंधाऱ्यातून पाणी घेण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी 25 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच, पिरंगुट, सूस, म्हाळुंगे, बावधन आणि भूगाव या पाच गावांसाठी सुमारे दोनशे कोटींची पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरातील पाण्याचा प्रश्‍न सुटणार आहे.'' 

पाणीवाटप समितीची स्थापना 
पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी पाणीवाटप समिती स्थापन करण्यात आली आहे. नगरविकास सचिव, महापालिका आयुक्‍त, जलसंपदाचे मुख्य अभियंता आणि पीएमआरडीएचे आयुक्‍त यांचा या समितीमध्ये समावेश असल्याचे गित्ते यांनी सांगितले. 

Web Title: PMRDA Water Fund will be charged