अबब, मास्क न वापरणाऱ्यांकडून पुणे जिल्ह्यात तीस लाखांचा दंड वसूल

जनार्दन दांडगे
Monday, 31 August 2020

ग्रामिण भागात विनामास्क फिरणाऱ्या तब्बल बारा हजाराहून अधिक नागरिकांवर जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या सुचनेसार जिल्हा (ग्रामिण) पोलिसांनी मागिल तीन दिवसाच्या काळात दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे.

लोणी काळभोर (पुणे) : ग्रामिण भागात विनामास्क फिरणाऱ्या तब्बल बारा हजाराहून अधिक नागरिकांवर जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या सुचनेसार जिल्हा (ग्रामिण) पोलिसांनी मागिल तीन दिवसाच्या काळात दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईतून पोलिसांनी बेशिस्त नागरिकांकडून तब्बल तीस लाख पन्नास हजार रुपयांचा दंडही वसूल करून सरकारच्या तिजोरीत जमा केला आहे. 

पुण्यात पावसाचा जोर ओसरणार

पुणे जिल्हा (ग्रामिण) पोलिस दलात ३१ पोलिस ठाणी असून, विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात इंदापूर पोलिसांनी बाजी मारली आहे. मागिल तीन दिवसाच्या काळात इंदापूर पोलिसांनी १३२० बेशिस्त नागरिकांवर कारवाई करून सुमारे सव्वालाख रुपयांचा दंड वसुल केला आहे. इंदापूर पोलिसांच्या पाठोपाठ पौड (८११) व सासवड (७२५) पोलिसांनी कारवाईत बाजी मारली आहे. तर, कारवाई करण्यात ओतुर, जुन्नर व लोणी काळभोर पोलिस अद्याप मागे आहे. या तीन पोलिस ठाण्यांनी कामगिरी उंचावण्याची गरज आहे.

पुणे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयाने पोचववला पुस्तकांचा ठेवा विद्यार्थ्यांच्या घरात

कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी मास्कचा वापर हाच एकमेव प्रभावी उपाय आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी तीन दिवसांपूर्वी विना मास्क बाहेर पडणारे अथवा पान, तंबाखू, गुटखा खाऊन थुंकणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि संघटना विरुद्ध भारतीय साथरोग अधिनियम १८९७, भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) कलम १८८ आणि या संदर्भातील शासनाचे प्रचलित इतर अधिनियम व नियम अन्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना ग्रामिण पोलिसांना दिल्या होत्या. त्याआधारे जिल्हा (ग्रामिण) पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी जिल्ह्यातील पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना विनामास्क फिरणारे व रस्त्यावर थुंकणाऱ्यांच्या विरोधात कारवाई सुरु करण्याच्या सुचना केल्या होत्या. 

याबाबत पोलिस अधिक्षक संदीप पाटील म्हणाले की, जिल्हातील ३१ पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी आपआपल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत विनामास्क फिरणारे व रस्त्यावर थुंकणाऱ्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई सुरु केलेली आहे. तीन दिवसाच्या काळात बारा हजाराहून अधिक नागरिकांवर कारवाई करण्यात आली. संबधितांकडुन तीस लाख पन्नास हजार रुपयांचा दंडही वसुल केला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करण्याबाबतच्या सुचना प्रशासन वेळोवेळी देतात. मात्र, नागरिक सुचनांकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे दंडात्मक कारवाई करण्याची वेळ पोलिसांवर आलेली आहे. गणपती विसर्जनानंतर कारवाईला आणखी वेग देण्यात येणार आहे. कोरोना पूर्णपणे थांबत नाही, तोपर्यंत कारवाई करणे सुरु ठेवणार आहे. 

रुग्ण संख्या अधिक कारवाई मात्र कमी 
लोणी काळभोर, लोणीकंद व सासवड पोलिस स्टेशनच्या हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, या तीनही पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रुग्णांची संख्या व कारवाईच्या संख्येत मात्र खूप तफावत दिसून येत आहे. या उलट इंदापूर व पौड पोलिसांनी मात्र कारवाईत बाजी मारल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे लोणी काळभोर, लोणीकंद व सासवड या तीनही पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी कारावाईला वेग व पोलिस कर्मचाऱ्यांचे बळ देण्याची गरज आहे.

कारवाईची पोलिस स्टेशननिहाय आकडेवारी व कंसात दंडांची रक्कम रुपयात)  बारामती शहर- ५२४ (६१ हजार), बारामती तालुका- २५७ (४६ हजार २००), वडगाव निंबाळकर- ३१३ (९९ हजार ३००), वालचंदनगर- २७४ (१ लाख १६ हजार १००), भिगवण- २७२ (६८ हजार ५००), इंदापूर- १३२० (१ लाख २३ हजार २००), दौंड- ३६७ (१ लाख २७ हजार ६००), यवत- ८६० (१ लाख ९२ हजार ४००), शिरूर- ४५७ (२ लाख २८ हजार ५००), रांजणगाव- २३८ (१ लाख १९ हजार), शिक्रापूर- ५७२, (१ लाख ४६ हजार १००), सासवड- ७२५ (९० हजार ९००), जेजुरी- ४२३ (८७ हजार ६००), भोर- ३०१ (१ लाख ३ हजार १००), राजगड- ४३१ (१ लाख ४ हजार ८००), हवेली- २४२ (४८ हजार २००), लोणी काळभोर- २१९ (१ लाख १७ हजार), वेल्हे- १४४ (३९ हजार), लोणीकंद- ३५९ (१ लाख ५२ हजार), पौड- ८११ (९३ हजार १००), लोणावळा ग्रामीण- २६३ (७७ हजार ९००), लोणावळा शहर- २७१ (८२ हजार ५००), वडगाव मावळ- ५९६ (९२ हजार ७००), कामशेत- १९५ (५८ हजार), खेड- ४१४ (२ लाख १५००), मंचर- ३४९ (१ लाख १० हजार ५५०), घोडेगाव- २२४ (५८ हजार ७००), जुन्नर- १३२ (९४ हजार ५५०), नारायणगाव- २११ (४२ हजार २००), आळेफाटा- २२२ (४० हजार ३००), ओतूर- १४३ (२४ हजार ५००). 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police action against citizens who do not wear masks in Pune district