esakal | पुण्यात पोलिस, महसूल प्रशासन ऑक्सिजन प्रकल्पावर करडी नजर ठेवून

बोलून बातमी शोधा

oxygen project

पुण्यात पोलिस, महसूल प्रशासन ऑक्सिजन प्रकल्पावर करडी नजर ठेवून

sakal_logo
By
महेंद्र शिंदे

खेड-शिवापूर : राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ऑक्सिजन प्रकल्पाचा प्रशासनाने ताबा घेतला आहे. या ऑक्सिजन प्रकल्पामधून फक्त रुग्णालयांनाच ऑक्सिजनचा पुरवठा केला जाईल, यासाठी दिवस रात्र पोलिस आणि महसूल प्रशासन या ऑक्सिजन प्रकल्पावर करडी नजर ठेवून आहे. कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले असून रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने उद्योगांना लागणारा ऑक्सिजन पुरवठा बंद करण्याचे आदेश काढले आहे. तसेच ऑक्सिजन प्रकल्पामधून तयार होणारा ऑक्सिजन फक्त रुग्णालयांणाच पुरवला जाईल, याकडे प्रशासन लक्ष ठेवून आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील ऑक्सिजन प्रकल्प पोलिस आणि महसूल विभागाच्या देखरेखीखाली आहेत. दिवस रात्र या ऑक्सिजन प्रकल्पावर पोलिस आणि महसूल विभागाचा पहारा ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा: बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांसाठी 25 कोटींचा निधी मंजूर

संबंधित ऑक्सिजन प्रकल्पात किती द्रव ऑक्सिजन येतो, प्रक्रिया होऊन तयार झालेला ऑक्सिजन बाहेर कोणत्या रुग्णालयाला पाठवला जातो. त्यानंतर संबंधीत रुग्णालयाला तो ऑक्सिजन मिळाला की नाही, याची खातरजमा करण्यात येत आहे. त्यामुळे प्राणवायू असलेल्या ऑक्सिजनला खऱ्या अर्थाने पोलिस आणि महसूल प्रशासनाचा खडा पहारा असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. याबाबत भोरचे तहसीलदार अजितसिंह पाटील म्हणाले, "ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन प्रकल्पावर देखरेख ठेवण्यात येत आहे. त्यामध्ये संबंधित प्रकल्पातून तयार होणाऱ्या ऑक्सिजनचे नियोजन करून रुग्णालयांना पुरवठा करण्यात येत आहे. तसेच त्या प्रकल्पात येणारा द्रव ऑक्सिजन आणि रुग्णालयांना पुरवठा होणारे ऑक्सिजन सिलेंडर यांची नोंद ठेवण्यात येत आहे."

"सध्या ऑक्सिजनची मागणी लक्षात घेता जास्तीत जास्त ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे काम सुरू आहे. मात्र मागणीच्या तुलनेत आम्हाला द्रव ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. आम्हाला पुरेशा प्रमाणात द्रव ऑक्सिजन उपलब्ध झाल्यास अजून जास्त प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा करता येईल," असे युनायटेड गॅस कंपनीचे अतुल नलावडे आणि मंगेश सुर्वे यांनी सांगितले.

हेही वाचा: जुन्नर नगर पालिकेच्या कोरोना योद्ध्यांची कामगिरी प्रशंसनीय