
बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांसाठी 25 कोटींचा निधी मंजूर
बारामती : खासदार सुप्रिया सुळे यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती, इंदापूर, वेल्हा आणि पुरंदर तालुक्यातील विविध रस्त्यांची दुरुस्ती तसेच नव्याने रस्ते उभारणीसाठी केंद्र सरकारने सुमारे 25 कोटी निधी मंजूर केला आहे. सुळे यांनी त्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहे. आपल्या मतदार संघातील विविध रस्ते बांधणी, पूल उभारणी तसेच सध्याच्या काही रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी सुप्रिया सुळे यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने निधी जाहिर केला आहे, असे सुळे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा: बारामती पोलिसांनी पकडला अडीच लाखांचा गुटखा
निधी मंजूर झालेल्या रस्त्यांमध्ये बारामती व इंदापूर तालुक्याला जोडणाऱ्या बारामती-जळोची-कण्हेरी-लाकडी-कळस-लोणी देवकर या रस्त्यासाठी 4 कोटी 91 लाख 48 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. इंदापूर तालुक्यातील वरकुटे खुर्द-वडापुरी-गलांडे वाडी नं. 2 या रस्त्यासाठी 4 कोटी 91 लाख 4 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
हेही वाचा: कोरोना काळात विकसित झाला लोकसहभागाचा बारामती पॅटर्न...
पुरंदर तालु्क्यातील चांबळी कोडीत-नारायणपूर-बहिरटवाडी काळदरी या 28 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी 4 कोटी 91लाख तर सासवड-राजुरी-सुपा रस्त्यासाठी 4 कोटी 91 लाख रुपये मंजूूर करण्यात आले आहेत. याबरोबरच वेल्हे तालुक्यातील महाड-मढेघाट-नसरापूर ते चेलाडी या 31 किमी अंतराच्या रस्त्यासाठी 4 कोटी 81 लाख रुपये मंजूर झाले आहेत.
Web Title: Twenty Five Crore Sanctioned For Roads In Baramati Loksabha
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..