कसबा पेठेत घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक; सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 September 2020

बंद असलेल्या घरातील तीन लाख रुपयांचा ऐवज चोरी झाल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती.  या प्रकऱणी आरोपीला फरासखाना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

पुणे - बहिणीकडे काही दिवसांसाठी राहण्यास गेलेल्या महिलेच्या बंद असलेल्या घरातील तीन लाख रुपयांचा ऐवज चोरी झाल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती.  या प्रकऱणी आरोपीला फरासखाना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून सव्वा तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीकडून घरफोडीचे आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जयवंत ऊर्फ जयड्या गोविंद गायकवाड (रा.आंबेडकर वसाहत, औंध) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 55 वर्षांच्या महिलेने फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व त्यांची मुलगी कसबा पेठेत राहतात. 20 सप्टेंबर रोजी त्या त्यांच्या मुलीसह कात्रज येथे राहणाऱ्या त्यांच्या बहिणीकडे राहण्यासाठी गेल्या होत्या. 

हे वाचा - सहकारी संस्थांच्या निवडणुकी लांबणीवर; सहकार व पणन विभागाने दिले आदेश

दरम्यान, 25 तारखेला सकाळी त्यांच्या शेजारील महिलेचा त्यांना फोन आला. त्यांच्या घराबाहेरील बल्ब सुरू असून दरवाजाही उघडा असल्याचे त्यांनी फिर्यादी महिलेस सांगितले. त्यानंतर त्या घरी आल्या. वेळी त्यांना त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात ठेवलेल्या सोन्याच्या बांगड्या, माळ, अंगठी, तीन पदरी राणी हार, चांदीची कासवाची कोयरी, अन्य दागिने व लक्ष्मीपुजनातील रक्कम असा तीन लाख रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेल्याचे निदर्शनास आले. 

फरासखाना पोलिस या गुन्ह्याचा तपास करत असताना सराईत गुन्हेगार जयवंत गायकवाड याने हा गुन्हा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, पोलिस कर्मचारी अभिनय चौधरी, ऋषीकेश दिघे, पंकज देशमुख, गणेश आटोळे आदींच्या पथकाने औंध येथे जाऊन आरोपीस अटक केली. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून सव्वा तीन लाख रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police arrest one in kasaba peth robbery case