बहाद्दराने शतक ठोकले, पण ते धावांचे नाही; घरफोडीच्या गुन्ह्यांचे

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 November 2020

चतुःश्रृंगी पोलिसांकडून घरफोड्यांचे शतक ठोकणाऱ्या चोरट्यास बेड्या 

पुणे ः क्रिकेटच्या खेळामध्ये शतक ठोकणाऱ्या खेळाडूला चाहते अक्षरशः डोक्‍यावर घेतात. पुण्यातही एकाने शतक ठोकले आहे, मात्र हे शतक चांगल्या कामाचे नसून घरफोड्याच्या गुन्ह्यांचे आहे. शंभरहून अधिक घरफोड्यांचे गुन्हे करणाऱ्या सराईत चोरट्याला चतुःश्रृंगी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून सात लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जयवंत उर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड (वय 32, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, औंध) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. औंध, बाणेर परिसरात मागील काही दिवसांपासून घरफोडीचे गुन्हे घडत होते. या पार्श्‍वभुमीवर चतुःश्रृंगी पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जात होता. दरम्यान, औंध, बाणेर परिसरातील घरफोडीचे गुन्हे जयवंत गायकवाड याने केल्याची खबर तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक प्रेम वाघमारे व त्यांचे पथक औंध परिसरात गस्त घालत असताना त्यांना मिळाली.

त्यानुसार, त्यांच्या पथकाने गायकवाड यास ताब्यात घेतले. त्याने काही दिवसांपुर्वीच तीन घरफोड्याचे गुन्हे केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. या घरफोड्यांमध्ये गायकवाड याने चोरलेला सात लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल माल पोलिसांनी जप्त केला. 

दरम्यान, संशयित आरोपी गायकवाड याचा शहराच्या वेगवेगळ्या भागातील घरफोड्यांमध्येही सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याकडे सखोल चौकशी केली, त्यावेळी गायकवाड याने आत्तापर्यंत शहरामध्ये तब्बल शंभरपेक्षा जास्त घरफोडीचे गुन्हे केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक वाघमोरे, पोलिस कर्मचारी सारस साळवी, ज्ञानेश्वर मुळे, संतोष जाधव, तेजस चोपडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

CET राज्यात प्रथम आलेल्या सानिका गुमास्तेने दिल्या टिप्स


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police arrest thief in pune