साडेचार लाख लुटणाऱ्या आरोपीस सुतारदऱ्यात अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

चिकन विक्रेत्यांकडून जमा केलेली रक्कम घेऊन जाणाऱ्या चिकन पुरवठादाराच्या कामगारास चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील साडेचार लाख रुपये व दुचाकी चोरल्याच्या गुन्ह्यातील आरोपीस कोथरूड पोलिसांनी अटक केली

पुणे - चिकन विक्रेत्यांकडून जमा केलेली रक्कम घेऊन जाणाऱ्या चिकन पुरवठादाराच्या कामगारास चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील साडेचार लाख रुपये व दुचाकी चोरल्याच्या गुन्ह्यातील आरोपीस कोथरूड पोलिसांनी अटक केली. यापूर्वी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

अमोल क्षीरसागर (वय ३२, रा. रामनगर, बोपखेल) असे संशयिताचे नाव आहे. पंकज नागेंद्र पांडे (रा. शेवाळवाडी) यांनी कोथरूड, वारजे ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादी हे चिकन पुरवठादाराकडे कामाला आहेत. ते किरकोळ चिकन विक्रेत्यांकडून मालाचे पैसे जमा करण्याचे काम करतात. दोन ऑक्‍टोबर २०१७ रोजी दुपारी ते दुचाकीवरून वारजे येथील सिप्ला सेंटरकडे जात होते. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या पाच-सहा जणांनी त्यांना अडविले. चाकूचा धाक दाखवून दुचाकी व चार लाख ५३ हजार २५५ रुपये व दोन धनादेश असा ऐवज घेऊन पळून गेले होते. याप्रकरणी पाच जणांना अटक केली होती; तर क्षीरसागर याने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. 

दोन वर्षांपासून तो फरारी होता. दरम्यान, जबरी चोरी व दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी सुतारदरा येथे येणार असल्याची माहिती कोथरूड पोलिस ठाण्याचे कर्मचारी विजय कांबळे यांना मिळाली. त्यानुसार, त्यांनी त्यास अटक केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police arrested robbers

टॅग्स