पोलिसांना मारहाण प्रकरणी फिर्यादी पोलिसावरच दबाव

प्रफुल्ल भंडारी 
रविवार, 26 ऑगस्ट 2018

गावठी दारू विकणाऱ्याने केली मारहाण.....
​पोलिसांना मारहाण करणारा अजय जाधव याच्यावर गावठी दारू विक्री व जुगार खेळल्याप्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पोलिसांना भररस्त्यात कॅालर पकडून मारहाण करण्यापर्यंत अवैध धंदे करणार्यांची मजल गेल्याने पोलिसांना आत्मपरीक्षणाची गरज आहे. 

दौंड (पुणे) : दौंड शहरात भररस्त्यावर ट्रिपल सीट जाणार्या अल्पवयीन युवकांना रोखल्याने गणवेशातील दोन पोलिस कॅान्स्टेबलांना मारहाण केल्यानंतर फिर्यादी पोलिस कॅान्स्टेबलवर पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या एका कर्मचार्याने दबाव आणल्याचा प्रकार समोर आला आहे. सदर पोलिस कर्मचारी हा अंगरक्षक म्हणून कार्यरत आहे.

दौंड शहरात शुक्रवारी (ता. २४) दुचाकीवर तीन अल्पवयीन मुलांनी व त्यापैकी एकाच्या वडिलांनी दौंड पोलिस ठाण्याचे कॅान्स्टेबल अमजद आदम शेख यांना कॅालर पकडून त्यांच्या तोंडावर बुक्की मारली होती. तर झालेला प्रकार माहित पडल्यावर घटनास्थळी पोचलेले कॅान्स्टेबल शेखर झाडबुके व गृहरक्षक दलाचे अमोल कुतवळ यांना देखील भररस्त्यावर शिवीगाळ व धक्काबुक्की केली होती. या बाबत अमजद आदम शेख (वय २९) यांच्या फिर्यादीनुसार अजय अण्णाराव जाधव (वय ४०, रा. गोवा गल्ली, दौंड) याला अटक करून तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले.  

दरम्यान शुक्रवारी (ता. २४) रात्री पोलिसांच्या ताब्यातील एका अल्पवयीन मुलगा हा दौंड शहरात वास्तव्य करणार्या एका पोलिस कर्मचार्याचा भाचा असल्याने त्याने दौंड पोलिस ठाण्यात येऊन अमजद शेख यांना फिर्याद देत असताना सविस्तर घटनाक्रम सांगण्याचा दम देत फिर्याद देण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु अमजद शेख यांनी त्यास स्पष्ट नकार देताच त्याने `` तूला नोकरी करायची ना ?`` असा दम भरला. 

दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील महाडिक यांना या दमदाटी बाबत शनिवारी (ता. २५) विचारले असता त्यांनी या प्रकरणी चौकशी करून कारवाई करणार असल्याचे सांगितले. पोलिसांना मारहाण प्रकरणी अटकेतील आरोपी अजय जाधव याला २७ आॅगस्ट पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर तिन्ही अल्पवयीन मुलांना सुधारगृहात पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 

गावठी दारू विकणाऱ्याने केली मारहाण.....
पोलिसांना मारहाण करणारा अजय जाधव याच्यावर गावठी दारू विक्री व जुगार खेळल्याप्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पोलिसांना भररस्त्यात कॅालर पकडून मारहाण करण्यापर्यंत अवैध धंदे करणार्यांची मजल गेल्याने पोलिसांना आत्मपरीक्षणाची गरज आहे. 

Web Title: police case filed in Daund