पोलिस आयुक्तांच्या ‘छडी’ची जादू

k.-venkatesham
k.-venkatesham

पुणे - वर्षानुवर्षे धूळ खात पडलेल्या फाईल, गुन्ह्यांचा वाढणारा डोंगर, तक्रारदार व गुन्ह्यांच्या तपासाकडे होणारे दुर्लक्ष... एक ते दीड वर्षापूर्वी कोणत्याही पोलिस ठाण्यात दिसणारे हे चित्र. आता मात्र ते बदलले असून, याचे सारे श्रेय आहे ते पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी सुरू केलेल्या आढावा बैठकीच्या छडीचे. मंगळवारी या बैठकीची पन्नाशी झाली.

डॉ. वेंकटेशम यांनी पुणे पोलिस आयुक्तपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर पहिल्यांदा पोलिस ठाण्यांमधील विस्कळित कारभार व वाढती गुन्हेगारी, अवैध धंद्यांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी शहरातील सर्व पोलिस ठाणी, गुन्हे शाखा व अन्य सर्व विभागांच्या पोलिस अधिकाऱ्यांची दर मंगळवारी नियमित बैठक (टीआरएम) घेण्यास त्यांनी सुरवात केली. गेल्या काही महिन्यांपासून नियमितपणे ही बैठक सुरू आहे. मंगळवारी ५० वी ‘टीआरएम’ पार पडली.

अधिकाऱ्यांनी आठवडाभर केलेली कामे, प्रलंबित कामे व गुन्ह्यांचा तपास, याचा आढावा या बैठकीत आयुक्त घेतात. यात अनेकदा अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली जात होती.

त्यामुळे प्रारंभी त्याबद्दल अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. परंतु, नियोजनबद्ध कामामुळे गुन्ह्यांचा तपास करण्यापासून प्रलंबित कामे मार्गी लावण्यास सुरवात झाली. अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामाची शिस्त व सवय लागली. वेळेत काम संपविण्यामुळे त्यांच्यावरील ताणही कमी झाल्याची सद्यःस्थिती आहे.

दत्तवाडी पोलिस ठाण्याची जबाबदारी घेतली तेव्हा २१५ गुन्हे व ५५० अर्ज प्रलंबित होते. ‘टीआरएम’च्या शिस्तीमुळे सध्या ७१ गुन्हे व १० अर्ज शिल्लक आहेत. ‘टीआरएम’चा पूर्वी त्रास वाटत असे. परंतु, आता कामाचा निपटारा होऊन आमच्यावरील ताणही कमी झाला आहे. नवीन तंत्रज्ञानही शिकायला मिळू लागले.
- देविदास घेवारे, पोलिस निरीक्षक, दत्तवाडी पोलिस ठाणे

पूर्वी एक महिन्याने बैठक होत असे. परंतु, आता ‘टीआरएम’मुळे प्रत्येकाला काम करण्याशिवाय पर्याय नाही. मी हडपसरला असताना ‘टीआरएम’मुळे तेथील गुन्हेगारी नियंत्रणात आणणे शक्‍य झाले. गुन्ह्यांचा तपास, प्रशिक्षणाला प्राधान्य देता येऊ लागले. एकूणच, उपलब्ध साधनसामग्रीवर चांगले काम कसे करता येईल, याचे प्रशिक्षण ‘टीआरएम’मुळे मिळाले. 
- सुनील तांबे, पोलिस निरीक्षक, बंडगार्डन पोलिस ठाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com