पुणे शहरातील मराठा नेत्यांना पोलिसांनी बजावली नोटीस; गुप्तचर विभागाने दिले आदेश

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 September 2020

मराठा आंदोलक कार्यकर्ते हे मंत्र्यांच्या भेटी आणि दौऱ्याच्या वेळी काळे झेंडे दाखवून त्यांच्यासमोर निदर्शने करून त्यांच्या ताफ्यास अडथळा करणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली असल्याचे पोलिसांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

पुणे : मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने राज्यभरातील मराठा तरुण-तरुणींमधून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. त्यामुळे मराठा आंदोलकांकडून मंत्र्यांच्या भेटी आणि दौऱ्यांच्यावेळी काळे झेंडे दाखवून गाड्या अडविण्याची शक्‍यता असल्याचा इशारा राज्य गुप्तचर विभागाने दिला आहे. त्यामुळे राज्यभरात मंत्र्याच्या दौऱ्याच्या काळात कडक बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आंदोलन करणाऱ्या शहरातील मराठा नेत्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत.

भारताच्या 'शुक्रयान'कडे वळल्या जगाच्या नजरा; शुक्रावर जाणारी जगातील एकमेव मोहीम!​

मराठा आंदोलक कार्यकर्ते हे मंत्र्यांच्या भेटी आणि दौऱ्याच्या वेळी काळे झेंडे दाखवून त्यांच्यासमोर निदर्शने करून त्यांच्या ताफ्यास अडथळा करणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली असल्याचे पोलिसांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर, सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी, उपायुक्त, सहायक आयुक्त आणि पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी त्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील गोपनीय यंत्रणा सतर्क करण्यात येऊन मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात यावे. तसेच मंत्र्यांच्या दौऱ्याच्या वेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पुरेसा बंदोबस्त लावण्यात यावा. योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येऊन कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी, असे आदेश राज्यभरातील पोलिसांना देण्यात आले आहेत.

'मित्र आणि वायसीएमच ठरले देवदूत'; कोरोनातून बरे झालेल्या उद्योजकाने भावना केली व्यक्त​

तर कायदेशीर कारवाईचा इशारा :
मराठा समाजाच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा गुरुवारी (ता.17) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. मोर्चातील प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. शहरात पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलिस आयुक्तांच्या पूर्व परवानगीशिवाय बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला आपण आणि आपल्या कार्यकर्त्यांना जबाबदार धरण्यात येईल. तसेच आपल्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असे या नोटिशीत म्हटले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police have issued notices to protesting Maratha leaders in Pune