पोलिसांच्या मदतीला धावतेय तरुणाई!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

वाघोली - वाघोली व परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांबरोबर तरुण पुढे येऊ लागले आहे. ग्रामसुरक्षा दल, सुरक्षारक्षक संघटना या माध्यमातून १० ते १५ तरुण दररोज रात्री पोलिसांबरोबर गस्त घालण्याचे काम करीत आहे. 

वाघोली - वाघोली व परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांबरोबर तरुण पुढे येऊ लागले आहे. ग्रामसुरक्षा दल, सुरक्षारक्षक संघटना या माध्यमातून १० ते १५ तरुण दररोज रात्री पोलिसांबरोबर गस्त घालण्याचे काम करीत आहे. 

या तरुणांना पोलिसांनी स्वरक्षणाचे धडेही दिले आहेत. हे तरुण दररोज रात्री दुचाकीवर पोलिसांबरोबर गस्त घालण्याचे काम करीत आहेत. वाघोलीसाठी एक पथक व अन्य गावांसाठी एक पथक अशी दोन पथके गस्तीचे काम करतात. त्यांच्या सोबत दोन पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांची टीम असते. त्यांना स्वतंत्र टी शर्ट देण्यात आले आहेत. काही सोसायट्यांचे सदस्यही या कामी मदत करीत आहेत. सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या तरुणांनी एकत्रित येऊन पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाघेश्वर सुरक्षारक्षक संघटनेची स्थापना केली आहे. या संघटनेचे सदस्य पोलिसांना मदत करीत आहेत. रात्री गस्त घालताना निदर्शनास येणाऱ्या आक्षेपार्ह बाबी हे सदस्य पोलिसांना कळवितात. आठवडे बाजार परिसरात सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याचा मानस या संघटनेने व्यक्त केला. या संघटनेच्या अध्यक्षपदी अनिल सातव, उपाध्यक्षपदी संदीप शिंदे, सचिवपदी अनिकेत सातव, प्रकाश लोले, खजिनदारपदी जामुवंत कंद यांची निवड झाली असून, विकास आव्हाळे, ऋषिकेश दाभाडे, मुकेश सातव, संदीप वारे, नीलेश सातव, रवी सातव संघटनेचे सदस्य आहेत.

गस्त घालण्यासाठी पोलिस पथकासमवेत तरुण मदतीला येतात. प्रत्येक गावातून अशीच तरुणांची मदत मिळाल्यास गुन्हेगारीला निश्‍चित आळा बसेल.’
- प्रताप मानकर, पोलिस निरीक्षक, लोणीकंद पोलिस ठाणे

वाघोलीचा वाढता परिसर तसेच अपुरे पोलिस कर्मचारी या बाबींचा विचार करता पोलिसांना तरुणांच्या मदतीची गरज आहे. यासाठीच संघटनेची स्थापना करून पोलिसांना मदत करण्याचा निर्णय घेतला.
- अनिल सातव, अध्यक्ष वाघेश्वर सुरक्षारक्षक संघटना

Web Title: Police Help Youth