पोलिस जवानांनी शारीरिक, मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवावे : अर्चना त्यागी

Police should take care of their mental and physical health says archana tyagi
Police should take care of their mental and physical health says archana tyagi

दौंड :  महाराष्ट्र पोलिस दलात दाखल झालेल्या नवप्रविष्ठ पोलिस जवानांनी शारीरिक व मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्याबरोबर संगणक क्षेत्रातील विविध कौशल्य आत्मसात करावीत, असे आवाहन राज्याच्या अपर पोलिस महासंचालक अर्चना त्यागी यांनी केले आहे.  

नानवीज (ता. दौंड) येथील पोलिस प्रशिक्षण विद्यालयात आज (ता. २६) ३९ व्या प्रशिक्षण सत्राच्या दीक्षांत संचलनाची प्रमुख पाहुणे म्हणून मानवंदना स्वीकारल्यानंतर बोलताना अर्चना त्यागी यांनी हे आवाहन केले. विद्यालयाच्या प्राचार्या तथा पोलिस अधीक्षक मनिषा दुबुळे यांनी प्रास्ताविक केले. तहसीलदार बालाजी सोमवंशी, समादेशक श्रीकांत पाठक, तानाजी चिखले, राज्य राखीव प्रशिक्षण विद्यालयाचे प्राचार्य नीलेश अष्टेकर, आदी या वेळी उपस्थित होते. 

अर्चना त्यागी म्हणाल्या, 'प्रशिक्षण काळात देण्यात आलेल्या विविध प्रकारच्या प्रशिक्षणामुळे सक्षम व संवेदनशील परंतु कायदा आणि निर्णयाबाबत खंबीर असणारे पोलिस महाराष्ट्र पोलिस दलाची मान उंचावतील. समाजातील प्रत्येक घटकाला त्यांच्या अडचणीच्या काळात पोलिसांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. जनतेचा पोलिसांवरील ठाम विश्वास पोलिसांना अहोरात्र सेवा करण्याचे बळ देत आहे. पोलिसांनी योगासने, योग्य आहार - विहाराच्या पध्दतींचे पालन करण्यासह वेळेचे, कामाचे आणि ताण -तणावाचे नियोजन करावे. आर्थिक नियोजन करावे.'  

विजयानंद सोनावणे (ठाणे शहर) यांनी दिमाखदार संचलनाचे नेतृत्व केले. तुषार यम्पलवार (गडचिरोली) यांना अष्टपैलू प्रशिक्षणार्थी म्हणून तर नाजूक मोहुर्ले (गडचिरोली), सागर शिंदे (मुंबई शहर) , विजयानंद सोनावणे (ठाणे शहर), दीपक तगरे (यवतमाळ), नितीन पाटील (नागपूर लोहमार्ग), हर्षल महाजन (जळगाव), गोविंद चाटे ( नागपूर शहर), निखिल पवार (सोलापूर ग्रामीण), नितीन गवळी (नागपूर लोहमार्ग) व उमेश ठाकूर (नागपूर शहर) यांना विविध गटांमधील कामगिरीसाठी प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. 

प्रशिक्षणार्थींनी या वेळी लेझीम, मल्लखांब आणि दहशतवाद विरोधी कारवाईचे प्रात्यक्षिकांसह आदिवासी नृत्य सादर केले. पोलिस निरीक्षक शामराव सांगळे व एस. बी. काळे यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य राजकुमार शिंदे यांनी आभारप्रदर्शन केले. 

विद्यालयातून १३ हजार ५०१ नवप्रविष्ठांचे प्रशिक्षण पूर्ण....
नानवीज पोलिस प्रशिक्षण केंद्रात नवप्रविष्ठांना नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण दिले जाते. ३९ व्या सत्रातील ६९७ नवप्रविष्ठांसह आजअखेर एकूण १३५०१ जणांना प्रशिक्षण देण्यात आले असून ते महाराष्ट्र पोलिस दलात सेवा बजावत आहेत, अशी माहिती मनिषा दुबुळे यांनी दिली.  
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com