#PunePolice पोलिसांचा उद्योजकाला जाच

पांडुरंग सरोदे 
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

पुणे - कौटुंबिक मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाने दुसऱ्या उद्योजक असलेल्या भावाविरुद्ध पोलिस ठाण्यात मारहाणीची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित उद्योजकास मानसिक त्रास देण्यास सुरवात केली. पुरावे तपासा, सत्य पुढे येईल, असे वारंवार सांगूनही पोलिसांचा जाच कमी झाला नाही. प्रकरण न्यायालयात गेले, त्यानंतर उद्योजकाने पोलिस आयुक्तांपासून केंद्रीय गृहमंत्र्यापर्यंत सगळ्यांना पत्र पाठवून न्यायाची मागणी केली. पण कोणीही दखल घेईना. ‘‘महाराष्ट्रातील शेकडो लोकांना माझ्या कंपनीत रोजगार दिला. त्याच महाराष्ट्रातील पोलिसांकडून त्रास दिला जातोय.

पुणे - कौटुंबिक मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाने दुसऱ्या उद्योजक असलेल्या भावाविरुद्ध पोलिस ठाण्यात मारहाणीची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित उद्योजकास मानसिक त्रास देण्यास सुरवात केली. पुरावे तपासा, सत्य पुढे येईल, असे वारंवार सांगूनही पोलिसांचा जाच कमी झाला नाही. प्रकरण न्यायालयात गेले, त्यानंतर उद्योजकाने पोलिस आयुक्तांपासून केंद्रीय गृहमंत्र्यापर्यंत सगळ्यांना पत्र पाठवून न्यायाची मागणी केली. पण कोणीही दखल घेईना. ‘‘महाराष्ट्रातील शेकडो लोकांना माझ्या कंपनीत रोजगार दिला. त्याच महाराष्ट्रातील पोलिसांकडून त्रास दिला जातोय. मी खरंच खूप वैतागलोय, म्हणूनच माझा व्यवसाय मी महाराष्ट्रातून राजकोटला हलवतोय,’’अशा शब्दांत हवालदिल झालेल्या उद्योजकाने आपली कैफियत मांडली आहे. 

मुंबईतील ६१ वर्षीय उद्योजक मुकेश गुप्ता यांच्याविरुद्ध जानेवारीमध्ये कोरेगाव पार्क पोलिसांकडे तक्रार दाखल झाली. एरवी एखाद्याचा जीव गेला, तरीही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांनी या प्रकरणात जरा जास्तच रस दाखवून गुप्तांच्या मागे ससेमिरा लावला.  गुप्ता म्हणाले, ‘‘कौटुंबिक मालमत्तेचे प्रकरण मिटविण्यासाठी भावाच्या बोलावण्यानुसार त्याच्या घरी गेलो होतो. पण सोसायटीच्या वॉचमनने आम्हाला आत सोडले नाही, त्यामुळे आम्ही तत्काळ माघारी गेलो. आम्ही अर्ध्या मिनिटात माघारी गेलो असताना भावाला मारहाण करण्याचा प्रश्‍न येतो कुठे ? याप्रकरणी सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले, मात्र पोलिसांनी पुराव्याची सीडी न्यायालयात दाखल केली नाही. आजही पोलिस त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

पोलिसांकडून जाणीवपूर्वक दिल्या जाणाऱ्या त्रासाबाबतच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून करण्यात येऊ लागल्या आहेत. पोलिसांकडून संबंधित प्रकरणाची दखल न घेणे, दुर्लक्ष करणे, किरकोळ तक्रारींसाठी कित्येक तास ताटकळत ठेवणे, पोलिस आयुक्तांच्या आदेशाचेही पालन न करणे यांसारखे पोलिसांबाबतचे गंभीर आक्षेप सर्वसामान्य नागरिक बोलू लागले आहेत.

अहल्यादेवी चौक ते तीन हत्ती चौकात प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यामध्ये रस्त्यावर विरुद्ध बाजूला असलेल्या रिक्षाथांब्यामुळे अधिक भर पडते. याविषयी भारती विद्यापीठ पोलिस, वाहतूक पोलिसांकडे तक्रार केली. अद्याप कोणीही साधी दखलही घेतली नाही.
- घनश्‍याम मारणे, धनकवडी

माझ्या घरासमोरील रस्ता एका व्यक्तीने बंद केला आहे. याप्रकरणाकडे मुंढवा पोलिसांनी दुर्लक्ष केले. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी उपायुक्त प्रकाश गायकवाड यांना सूचना दिल्या. त्यांनी ठाण्यात येऊन भेटण्यास सांगितले. परंतु, तेथील कर्मचाऱ्यांनी गायकवाड यांना भेटूच दिले नाही. 
- दत्तात्रय वाघमोडे, मुंढवा

(मालिका समाप्त)

Web Title: The police trouble to businessman