पोलिस बनले मामा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

लोणी काळभोर - पुणे- सोलापूर महामार्गावरील लोणी स्टेशन येथील गजबजलेल्या चौकात आज दुपारी साडेबाराच्या सुमारास वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू होती...त्या वेळी समोरील दृश्‍य पाहून या पोलिसदादांच्या मनातील संवेदना जाग्या झाल्या...तेथे रस्त्याकडेलाच एक महिला अचानक प्रसूत झाली होती! त्यामुळे ते तिच्यासाठी ‘भाऊ’; तर तिच्या नवजात अर्भकासाठी ‘मामा’ झाले! हे सुखद चित्र परिसरातील शेकडो नागरिकांनी आपल्या डोळ्यांत साठवले व या पोलिसदादांचे कौतुक केले.

तमन्ना हमीद शेख (वय ३०, रा. सध्या बाजारमळा, लोणी काळभोर, मूळगाव वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर) हे या रस्त्यात जन्म दिलेल्या बाळाच्या आईचे नाव असून, संदीप देवकर व सतीश राजपूत ही त्यांना मदत करणाऱ्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. हे दोघेही लोणी काळभोर पोलिसांच्या वाहतूक शाखेत काम करतात. 

तमन्ना शेख या आपल्या आठ वर्षांच्या माहिरा या मुलीसह लोणी स्टेशन परिसरातील एका रुग्णालयात सोनोग्राफी करण्यासाठी पायी चालल्या होत्या. लोणी स्टेशन चौकात मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ होती. त्यामुळे त्या रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभ्या राहिल्या. मात्र, त्याचवेळी त्यांना प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या. कोणालाही काही समजण्याच्या आतच त्या रस्त्यातच कोसळल्या. लोकांना वाटले की, त्या खाली बसल्या असाव्यात. त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, चौकातच वाहतूक सुरळीत करण्यासाठी उभे असलेले वाहतूक पोलिस कर्मचारी संदीप देवकर यांना त्यांची अडचण लक्षात आली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता सहकारी सतीश राजपूत यांना बोलावून घेतले. दोघेही मदतीसाठी सरसावले. मात्र, महिलेची प्रसूती झाल्याचे लक्षात येताच, देवकर यांनी त्यांचे वाहतूक वॉर्डन अनिल अडागळे व दादा लोंढे यांना जवळच्या दुकानात चादर आणायला लावले व त्यांच्या कडेला धरले. तसेच, रस्त्यातून जाणाऱ्या एका महिलेस थांबवून तिच्याकडे मदतीची याचना केली.

सुरवातीला आढेवेढे घेणाऱ्या महिलेने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तमन्ना व नवजात मुलीला उचलण्यास मदत केली. त्यानंतर पोलिसांनी तमन्ना शेख व तिच्या नवजात बाळाला जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन पुढील उपचारासाठी दाखल केले. पोलिसांच्या या कार्यतप्तरतेला नागरिकांनी सलाम केला.

आठवा महिना चालू असल्याने सोनोग्राफी करण्यासाठी पायी निघाले होते. मात्र, रस्त्यातच प्रसूती कळा सुरू झाल्या. काही समजण्याच्या आतच प्रसूती झाली. ही घटना घडल्यावर क्षणाचाही विलंब न लावता संदीप देवकर व सतीश राजपूत व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेली मदत मी विसरूच शकत नाही. दोघेही देवदूत आहेत.  
- तमन्ना शेख

Web Title: Police Woman Delivery Humanity