स्वस्त धान्य दुकानदारांना मारहाणीचे प्रकार; सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 April 2020

काही राजकीय नेते, कार्यकर्ते, टवाळखोर शासकीय योजनांची माहिती न घेता दुकानदारांना नाहक त्रास देत असून त्यांची बदनामीही करत आहेत. तसेच अधिकारी आणि लोकप्रतिनिधीही खरी माहिती जाणून न घेता दुकानदारांना लक्ष्य करत आहेत.

वडगाव मावळ : राज्यावर कोराना व्हायरसचे संकट घोंघावत असताना आपला जीव धोक्यात घालून स्वस्त धान्य दुकानदार धान्य वितरित करत आहेत. मात्र, त्यांना नाहक त्रास देण्याचे प्रकार काही समाजकंटक करत असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आणि टवाळखोरांनी मावळ तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. एकीकडे मारहाणीचे प्रकार घडत असताना दुसरीकडे अधिकारी आणि लोकप्रतिनिधीही दुकानदारांना धारेवर धरत आहेत. या जाचाला कंटाळून १ मे पासून सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा मावळ तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष बाबूलाल नालबंद यांच्यासह सर्व पदाधिकारी व दुकानदारांनी तहसीलदार मधुसूदन बर्गे तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन पाठविले आहे.

- Lockdown : ... यासाठी देशात मिलिटरी तैनात करा; सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल!

त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, केंद्र शासन व राज्य शासनाच्या योजनेप्रमाणे लाभार्थ्यांना धान्य वितरित करण्यात आले असून प्रतिव्यक्ती पाच किलो याप्रमाणे मोफत तांदूळ वाटपही पूर्ण होत आले आहे; परंतु काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि समाजातील काही टवाळखोर सोशल मीडियाच्या माध्यमातून रेशनिंग दुकानदारांची नाहक बदनामी करत आहेत.

अन्न सुरक्षा कायदा २०१३ अंमलात आल्यानंतर त्यांनी शिधापत्रिकाधारकांचे आधार कार्ड लिंक करून घेण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत. अथवा प्राधान्य लाभार्थ्यांच्या यादीत शहरी भाग ४५% आणि ग्रामीण भाग ७६% शिधापत्रिका धारकांचा समावेश करण्यासाठी कोणतेच प्रयत्न केले नाहीत.

- लॉकडाऊनमुळं संसार मोडण्याच्या मार्गावर; घटस्फोटांसाठी वाढले अर्ज

एका राजकीय पक्षाच्या शहराध्यक्षाने दुकानदारांकडे मागितलेली कागदपत्रे न दिल्याने दुकानदारास मारहाण केली. चाकण येथे सरपंच, उपसरपंचांच्या उपस्थितीत धान्य वाटप केले. दिवड येथे मारहाणीचा प्रयत्न करण्यात आला. तर शिवणे येथे मारहाण आणि पाचाणे येथे जबरदस्तीने धान्य नेण्याचा प्रकार घडला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, शासनाने मास्क, सॅनिटायझर सारख्या सुविधा उलपब्ध न करून देताही स्वतःचा जीव धोक्यात घालून दुकानदार नियमांचे पालन करूनच धान्य वितरित करत आहेत; परंतु काही राजकीय नेते, कार्यकर्ते, टवाळखोर शासकीय योजनांची माहिती न घेता दुकानदारांना नाहक त्रास देत असून त्यांची बदनामीही करत आहेत. तसेच अधिकारी आणि लोकप्रतिनिधीही खरी माहिती जाणून न घेता दुकानदारांना लक्ष्य करत आहेत. त्यामुळे सतत होणाऱ्या या त्रासाला कंटाळून तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी सामूहिक राजीनामे देण्याचा निर्णय घेतला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

- Coronavirus : उद्यापासून काही भागातील उद्योगधंद्याना माफक स्वरुपात परवानगी : मुख्यमंत्री

खोटे उत्पन्न दाखवून धान्य लाटणाऱ्यांवरही कारवाई करा

रेशन दुकानदार नियम डावलून चुकीच्या पद्धतीने धान्य वितरित करत असतील, तर त्या दुकानदारांवर खुशाल कारवाई करावी. तसेच रेशनकार्डवर खोटे उत्पन्न दाखवून लाभ घेणाऱ्या नागरिकांवरही कारवाई करावी, अशी मागणी मावळ तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष बाबूलाल नालबंद यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: political party workers have beaten up ration shopkeepers in Maval taluka