बारामतीतही शिवसेना वाढवणार ताकद; सुरु आहे 'ही' मोहीम

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 31 December 2019

राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, असे असले तरी शिवसेनेने आपली पाळेमुळे ग्रामीण भागातही घट्ट करण्यास पुन्हा एकदा प्रारंभ केला आहे.

बारामती : राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, असे असले तरी शिवसेनेने आपली पाळेमुळे ग्रामीण भागातही घट्ट करण्यास पुन्हा एकदा प्रारंभ केला आहे. नवीन युती अस्तित्वात आलेली असली तरी पक्षसंघटना मजबूत करण्याकडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ऍड. राजेंद्र काळे यांनी नव्याने लक्ष दिले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी शिवसेनेच्या वतीने बारामती तालुक्यातील मगरवाडी येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन केले गेले. यासह ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्डचेही वितरण केले गेले.

बारामतीकरांसोबत हातात हात घालून उद्धव ठाकरे निघालेले असले तरी पक्ष पातळीवर मात्र आपला पक्ष मजबूत करण्याकडेच त्यांचा कल आहे, हेच यातून दिसून आले. बारामती तालुक्यातच शिवसेनेचा विस्तार व्हावा या उद्देशाने ही शाखा व स्मार्टकार्ड वितरणाचा कार्यक्रम झाला. आगामी काळात शिवसेनेच्या आणखी शाखा बारामती मतदारसंघात सुरु करणार असल्याचेही राजेंद्र काळे यांनी नमूद केले.

शरद पवार अजित पवारांना म्हणाले, संधीचं सोनं करा

युतीत सरकार चालवायचे असले तरी आपला पक्ष सक्षम व्हावा व आगामी निवडणूकीत आमदारांची संख्या वाढावी यासाठी शिवसेनेने संघटना बांधणीची ही तयारी सुरु केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

शिवसेनेचे संपर्कप्रमुख सत्यवान उभे, ऍड. राजेंद्र काळे, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब शिंदे, संजय काळे, जिल्हा समन्वयक विशाल बोंद्रे, भीमराव भोसले, तालुका प्रमुख विश्वास मांढरे, नीलेश मदने, निखिल देवकाते, विवेक साळुंखे, सुदाम गायकवाड, सुभाष वाघ, दत्ता लोणकर, बंटी गायकवाड, कल्याण जाधव, मुरुमचे शाखाप्रमुख संदीप गायकवाड, आदेश काळे, शिवाजी शेंडकर, भगवान गोफणे आदी यावेळी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political Strength of Shivsena will Increase in Baramati