मेट्रो मार्गाला राजकीय वळण!

रविवार, 12 ऑगस्ट 2018

पुणे - नगरसेवकांकडून मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणासंदर्भात येणाऱ्या प्रस्तावांचा सर्वंकष विचार करून त्यावर कार्यवाही झाली पाहिजे. या प्रकल्पावर प्रत्यक्षात होणाऱ्या खर्चाचा विचार न करता केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नागरिकांना दिवा ‘स्वप्न’ दाखविणे चुकीचे आहे. सार्वजनिक वाहतूक  व्यवस्था सक्षम करण्याकडेही नगरसेवकांनी लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. महापालिकेच्या तिजोरीला झेपेल तेवढ्याच घोषणा करण्याचा सल्लाही स्वयंसेवी संस्थांनी दिला आहे. 

पुणे - नगरसेवकांकडून मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणासंदर्भात येणाऱ्या प्रस्तावांचा सर्वंकष विचार करून त्यावर कार्यवाही झाली पाहिजे. या प्रकल्पावर प्रत्यक्षात होणाऱ्या खर्चाचा विचार न करता केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नागरिकांना दिवा ‘स्वप्न’ दाखविणे चुकीचे आहे. सार्वजनिक वाहतूक  व्यवस्था सक्षम करण्याकडेही नगरसेवकांनी लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. महापालिकेच्या तिजोरीला झेपेल तेवढ्याच घोषणा करण्याचा सल्लाही स्वयंसेवी संस्थांनी दिला आहे. 

मेट्रोच्या पिंपरी ते शिवाजीनगर शासकीय गोदाम (जिल्हा न्यायालय), वनाज ते शिवाजीनगर शासकीय गोदाम या मार्गाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. पीएमआरडीएकडून हिंजवडी ते शिवाजीनगर शासकीय गोदामादरम्यान मेट्रो मार्गाचे काम हाती घेण्यात येणार आहे. गेल्या तीन महिन्यांत या मार्गांचे विस्तारीकरण आणि आपल्या भागात मेट्रो सुरू करावी, अशी मागणी नगरसेवकांकडून होत आहे. स्थायी समितीसमोर या मार्गांचे प्रस्ताव मांडून त्याचा प्रकल्प अहवाल तयार करून घेण्यासाठी नगरसेवकांची जणू स्पर्धाच सुरू झाली आहे. 

नगरसेवकांकडून मागणी वाढत असली, तरी प्रत्यक्षात महामेट्रो या कंपनीकडे पिंपरी ते निगडी, नाशिक फाटा ते चाकण, स्वारगेट ते कात्रज या विस्तारित मार्गांचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम आहे. स्थायी समितीने सिंहगड रस्ता, पौड रस्त्यावर चांदणी चौकापर्यंत, पौड फाटा ते शिवणे, नगर रस्त्यावर रामवाडी ते वाघोली, रामवाडी ते लोहगाव विमानतळ, सोलापूर रस्ता इत्यादी रस्त्यांवर मेट्रो उभारण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्यास मान्यता दिली आहे. हे प्रस्ताव अद्याप महामेट्रोकडे पाठविण्यात आलेले नाहीत.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनच याबाबत निर्णय घेऊ शकतात. त्यांच्याकडून प्रकल्प अहवाल तयार करण्याचा प्रस्ताव आल्यानंतरच त्यावर काम करता येईल. त्यानंतर संबंधित मार्गाची व्यवहार्यता स्पष्ट होईल. त्यासाठी खर्च किती, खासगी आणि सार्वजनिक वाहनातील प्रवासी संख्या, जागेची उपलब्धता अशा सर्व गोष्टींचा अभ्यासातून प्रकल्प अहवाल तयार करून प्रस्ताव दिले जातील, असे महामेट्रोच्या सूत्रांनी सांगितले.

साडे अकरा हजार कोटी खर्च अपेक्षित
वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट या मेट्रो मार्गांच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू आहे. प्रत्यक्षात हे काम पूर्ण होऊन मेट्रो धावण्यासाठी २०२१ साल उजाडणार आहे. तसेच भुयारी मार्गातील मेट्रो धावण्यासाठी २०२२ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. या प्रकल्पांसाठी सुमारे साडेअकरा हजार कोटी रुपये खर्च होणार आहे.

मेट्रो मार्गाचे प्रस्ताव सध्या केवळ राजकीय हेतूने येत असल्याचे दिसत आहे. अभ्यास, नियोजन आणि सर्वंकष वाहतूक व्यवस्थेचा समावेश यात हवा. सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्‍न यातून सुटेल असे स्वप्न दाखविले जात आहे. या प्रकल्पाचा खर्च आणि सेवा सुरू होण्याचा कालावधी याचाही विचार व्हावा. तसेच सार्वजनिक व्यवस्थेला या खर्चाच्या दहा टक्के रक्कम उपलब्ध करून दिली, तर बरेच प्रश्‍न सुटू शकतील.
- जुगल राठी, अध्यक्ष, पीएमटी प्रवासी मंच

Web Title: political turn of the metro route