मुख्यमंत्रीपदासाठी आता देवाला साकडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

मुख्यमंत्रिपदावर देवेंद्र फडणवीस यांचा लवकरात लवकर शपथविधी व्हावा, यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी कुलदैवत श्री लक्ष्मी नृसिंहास महापूजा केली. तर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी तरुणांनी देवाला साकडे घातले.

नीरा नरसिंहपूर (पुणे) : मुख्यमंत्रिपदावर देवेंद्र फडणवीस यांचा लवकरात लवकर शपथविधी व्हावा, यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी कुलदैवत श्री लक्ष्मी नृसिंहास महापूजा केली. तर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी तरुणांनी देवाला साकडे घातले.

नीरा नरसिंहपूर (ता. इंदापूर) येथील श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबीयांचे कुलदैवत आहे. त्यामुळे राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन मुख्यमंत्री म्हणून पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी व्हावा, यासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी श्री लक्ष्मी नृसिंहचरणी महापूजा घालून प्रार्थना करून साकडे घातले. पौरोहित्य मुख्यमंत्र्यांचे पुजारी कमलेश डिंगरे व लक्ष्मीकांत डिंगरे यांनी केले. या वेळी सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक जयकुमार पाटील, गजानन गवई, प्रसाद कुलकर्णी, नरसिंहपूरच्या सरपंच कांचन डिंगरे, दशरथ राऊत, अमर भोसले, संजय कोळी उपस्थित होते.

दुसरीकडे, संगम (ता. माळशिरस) ते नीरा नरसिंहपूर हे पाच किलोमीटरचे अंतर युवासेनेचे कार्यकर्ते पदयात्रेद्वारे आले होते. राज्याच्या मुख्यमंत्रिपदी आदित्य ठाकरे विराजमान व्हावेत, यासाठी पदयात्रा काढून नरसिंहाच्या चरणी साकडे घालून प्रार्थना केली. यामध्ये युवासेनेचे नेते गणेश इंगळे, माळशिरस तालुकाप्रमुख सोनू पराडे पाटील, सोलापूर जिल्हा उपप्रमुख शेखर खिलारे, अकलूज शहरप्रमुख महादेव बंडगर, पिंटू चव्हाण, सागर इंगळे, कल्याण इंगळे, डॉ. साळुंखे, अमर भोसले सहभागी झाले होते. नरसिंहपूर ग्रामपंचायतीचे नरहरी काळे, दशरथ राऊत, नितीन सरवदे, जगदीश सुतार यांच्यासह ग्रामस्थांनी श्रीफळ देऊन पदयात्रेचे स्वागत केले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Politics After Vidhan Sabha Election 2019