राष्ट्रवादी-शिवसेना आघाडी, कुठे ते वाचा...

प्रफुल्ल भंडारी
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व शिवसेना एकत्र येण्याची चर्चा गेले काही दिवस सुरू होती. मात्र, दौंड नगरपालिकेत मागील पावणेतीन वर्षांपासून दोन्ही पक्ष आघाडी करून सत्तेत आहेत.

दौंड (पुणे) : राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व शिवसेना एकत्र येण्याची चर्चा गेले काही दिवस सुरू होती. मात्र, दौंड नगरपालिकेत मागील पावणेतीन वर्षांपासून दोन्ही पक्ष आघाडी करून सत्तेत आहेत.

दौंड नगरपालिकेच्या जनतेतून थेट निवडून द्यावयाच्या नगराध्यक्षपदासाठी आणि बारा प्रभागातील चोवीस जागांसाठी डिसेंबर 2016 मध्ये मतदान झाले होते. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार रमेश थोरात यांनी निवडणुकीत राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीसाठी पुढाकार घेतला होता. राष्ट्रवादी व शिवसेनेची आघाडी असली तरी उमेदवारांनी आपापल्या पक्ष चिन्हावर ही निवडणूक लढविली होती. सदर निवडणुकीत राष्ट्रवादी-शिवसेना आघाडी, राष्ट्रीय समाज पक्षाचे तत्कालीन आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखालील नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षाचे स्वतंत्र पॅनेल यांच्यात सरळ लढत झाली होती.

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत नागरिक हित संरक्षण मंडळाच्या शीतल योगेश कटारिया यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार मीनाक्षी नंदकुमार पवार यांचा अवघ्या 120 मतांनी पराभव केला होता. नगरपालिकेत सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, शिवसेना, बहुजन रयत परिषद, पीपल्स रिपब्लिकन पार्टी विकास आघाडी या नोंदणीकृत गटाचे निवडून आलेले 14 व 2 स्वीकृत, असे एकूण 16 सदस्य आहेत. नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडी या गटाचे निवडून आलेले 10 सदस्य व 1 स्वीकृत, असे एकूण 11 सदस्य आहेत. आघाडीच्या निवडून आलेल्या 14 सदस्यांपैकी राष्ट्रवादीचे 12 व शिवसेनेचे 2 सदस्य आहेत. अवघे दोन सदस्य असले तरी एक वर्ष उपनगराध्यक्ष आणि विषय समित्यांचे सभापतिपदे मिळाल्याने शिवसेनेचा सत्तेतील वाटा अधिकचा राहिला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Politics Between Shivsena & NCP